गोकुंदा येथील महात्मा फुले विद्यालयात एनसीसी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा
किनवट, ता. १० (बातमीदार) : महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता. किनवट) येथे एनसीसी अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटीचा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात नुकताच (ता.08) पार पडला. एनसीसीचे महत्त्व, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना यावेळी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके तसेच संस्थेच्या कोषाध्यक्षा व प्राचार्या शुभांगी ठमके यांच्या पुढाकारातून ८ जुलै रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमास एनसीसी ग्रुप मुख्यालय, छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर तसेच ५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नांदेडचे कमांडिंग ऑफिसर कर्नल के. दिलीप रेड्डी यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वक्षमता, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शिक्षणतज्ज्ञ किशोरी पाठक यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणातील सातत्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेकंड ऑफिसर ज्ञानेश्वर कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक प्रा. संतोष ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व पालकांची उपस्थिती होती. उपस्थितांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

Comments
Post a Comment