(किनवट ता. प्रतिनिधी)
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५करिता मंगळवारी (ता.२ )२९मतदान केंद्रावर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून अध्यक्षपदासाठी ८व सदस्यपदांसाठीच्या ९०उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात नोंदवले आहे.
पुरुष १२३३४ , स्त्री १३२५६व ईतर ०३ असे एकूण २५५९३ मतदार नगर परिषदेच्या १० प्रभागात आहेत. सकाळी ६.३०वाजता अभिरूप मतदान ( मॉकपोलच्या) व ७.३० वाजता प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काही ठिकाणी मतदान यंत्रात दोष आढळल्याने तिथे राखीव मतदान यंत्र वापरले . सकाळी ७.३० ते ९.३०दरम्यान ५.६१% , सकाळी ७.४० ते ११.३०दरम्यान १५.५१% ,
सकाळी ७.३० ते दुपारी १.३० दरम्यान २९.१८% , सकाळी ७.३० ते दुपारी ३.३०दरम्यान ४६.२१% . तीन मतदान केंद्रावर ५.३० वाजता ७४.२७ % मतदान झाले.
सकाळी धिम्या गतीने मतदानास प्रारंभ झाला. दुपारनंतर मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र बहुतांशी मतदान केंद्रावर दिसले.
तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी विवेक कांदे, नायब तहसिलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक चंद्रशेखर सहारे, नायब तहसीलदार म. रफिक म. बशीरोद्दीन, नायब तहसीलदार बालाजी फोले, निलेश राठोड, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे व मल्लिकार्जून स्वामी आदिंसह सर्व अधिकारी-कर्मचारी , मास्टर ट्रेनर्स यांनी सकाळी ५.३० वाजतापासूनच परिश्रम घेतल्याने ही निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे व शांततेत पार पडली.
उप विभागिय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान जनजागृती (स्वीप कक्षाच्या) वतीने केलेल्या आवाहनानुसार तृतीय पंथी मतदार शिवन्या राजू कोटलवार यांनी नांदेडवरून येऊन जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा नयाकॅम्प किनवट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.


Comments
Post a Comment