किनवट पालिका मतदार यादी आक्षेपादरम्यान राडा, काँग्रेसच्या माजी उपनगराध्यक्षाने कार्यकर्त्याचे डोके फोडले
किनवट : किनवट नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या मतदार प्रारूप यादीवर हरकत घेत मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करणाऱ्या एका काँग्रेस कार्यकर्त्यांशी वाद घालत काँग्रेसच्याच माजी उपनगराध्यक्षांनी डोक्यात पेपरवेट घालून त्या कार्यकर्त्यांचे डोके फोडल्याची घटना शुक्रवारी दि. १० सायंकाळी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातच घडली.
@याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत.
किनवट पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष, प्रभार्गाच्या आरक्षणानंतर मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध केली. सदर यादीवर शुक्रवारी हरकती मागविण्यात आल्या होत्या. कोण्या प्रभागात लोकसंख्या अधिक तर मतदार कमी, कुठे मतदार जास्त तर लोकसंख्या कमी अशा बाबींवर विविध पक्षाच्या इच्छुकांकडून मुख्याधिकाऱ्यांकडे हरकती घेत चर्चा सुरु होती. दरम्यान शहराच्या सरदारनगर, नेहरुनगर या प्रभाग १० मधील शेकडो
मतदारांची नावे मतदार यादीत नसल्याची बाब काँग्रेस कार्यकर्ता वसंत राठोड यांनी प्रभारी मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या निदर्शनास आणून देत यावर
चर्चा करीत असताना काँग्रेस कार्यकर्ते तथा माजी उपनगराध्यक्ष अभय महाजन यांनी मुख्याधिकारी व विविध पक्षांच्या कार्यकत्यदिखत वसंत राठोड यांच्याशी वाद वाद घातला. या वादानंतर रागाच्या भरात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर असलेला पेपरवेट वसंत राठोड यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात वसंत राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून रक्तस्त्राव सुरू झाला. पालिका कर्मचारी व उपस्थित कार्यकत्यांनी परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. दरम्यान स्फोटक परिस्थिती पाहून मुख्याधिकारी
विवेक कांदे यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. राड्याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दिली. राड्यानंतर पालिका कार्यालय व पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच किनवटमध्ये निवडणूकपूर्व हिंसाचार सुरू झाल्याने निवडणुकीदरम्यान जोरदार राडे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Post a Comment