किनवट,दि.१७ : लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने मागास आणि आदिवासी समाज विकास विभागाचा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविला आहे. सरकारची ही कृती घटनाबाह्य व गरीब समाजाच्या तोंडचा घास पळवणारी आहे.सरकारने हा निधी त्या त्या विभागाकडे त्वरीत वर्ग करावा,अशी मागणी सेक्युलर मुव्हमेंट या संघटनेचे जिल्हा संघटक अॅड.मिलिंद सर्पे यांनी एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे नुकतीच केली आहे.
लाडकी बहिण या खर्चिक योजनेसाठी अन्य कोणत्याही विभागाचा निधी आम्ही घेणार नाही, असे सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सांगितले होते. मात्र सरकार ते विसरले आहे. या विभागातील तब्बल ७हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी या योजनेकडे वळवला आणि गरीब मागास समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यांचे हक्काचे पैसे वळवले व त्यांना याची साधी माहितीही या सरकारने दिली नाही, उलट दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.सरकारने निवडणूक जिंकली व लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची छाननी केली. निवडणुकीपूर्वी सरसकट प्रत्येक अर्ज मंजूर करणाऱ्या सरकारने निवडणूक जिंकल्यानंतर सत्ताप्राप्ती होताच तब्बल ५ लाखांपेक्षा जास्त बहिणींना या योजनेतून वगळले.
||सरकारची कृती घटनाबाह्य||
उर्वरित बहिणींना दरमहा पैसे देणे भाग असल्याने मागास समाजासाठीचा ३ हजार कोटी आणि आदिवासी समाजाचा ४ हजार कोटी असा तब्बल ७ हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेकडे वळवला. मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळत असलेल्या मदतीवर याचा परिणाम होणार आहे.सरकारने हा निधी त्वरित त्या त्या विभागाकडे वर्ग करावा. राज्यातील मागास व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक योजना निधी नसल्याने रखडल्या आहेत.शिष्यवृत्तीसारख्या योजनांचे पैसे न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा यासंदर्भात सेक्युलर मुव्हमेंट या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर सेक्युलर मुव्हमेंट चे जिल्हा संघटक अॅड.मिलिंद सर्पे यांची स्वाक्षरी आहे.
------------------------------------------------------•
Comments
Post a Comment