किनवट (तालुका प्रतिनिधी) न्यायालयीन
कामकाजासाठी तहसील कार्यालयात गेलेल्या वकिलाचा पक्षकारासमोर अवमान केल्याप्रकरणी किनवटच्या वकील संघाने तहसीलदार शारदा चौंडेकर यांचा निषेध करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
यासंदर्भात किनवटच्या दिवाणी न्यायाधीशांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वकील विलास सूर्यवंशी हे दि. ५ फेब्रुवारी रोजी पक्षकारासोबत न्यायालयीन कामकाजासाठी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी आक्षेप क्रता / प्रतिवादी यांचे म्हणणे सादर करण्यासाठी केस मधील वादपत्राच्या / अर्जाच्या व सोबत दिलेल्या कागद पत्राच्या प्रति तहसीलदार शारदा चौंडेकर यांना मागितल्या असता त्यांनी फाईल न बघता तुम्ही कागद सांगा असे उद्धट बोलून पक्षकारासमक्ष "गेट आऊट" असे अँड . सूर्यवंशी यांना उद्देशून पदाला कलंकित करणारी अवमानकारक व वकिली व्यवसायाची अवमूल्यन करणारी भाषा
केली. शिवाय, सूर्यवंशी यांच्या पक्षकाराला 'यांना कशाला वकील म्हणून लावले' असा प्रश्न करत पुन्हा सूर्यवंशी यांचा अवमान केला. तालुका दंडाधिकाऱ्यांच्या या कृतीचा किनवट वकील संघाने निषेध केला. अवमानाच्या निषेधार्थ वकील संघाने सोमवारी दि. १७ रोजी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. वकिलाचा अवमान करणाऱ्या तहसीलदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वकील संघाने केली आहे. दिवाणी न्यायाधीशांना निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अँड . राहुल सोनकांबळे, उपाध्यक्ष एस. एम. राठोड, सचिव अँड एस. पी. शिरपुरे, कोषाध्यक्ष अँड एम. एम. बडगुजर आदींच्या सह्या आहेत.

Comments
Post a Comment