Skip to main content

बदलू या रंगपंचमी चे‘रंग’.... रुचिरा बेटकर यांचा रंग पंचमी निमित्त विशेष लेख




 बदलू या रंगपंचमी चे‘रंग’....

मार्च महिना आला की सर्वांना होळी आणि रंगपंचमीचे वेध लागतात. अनेकांनी तर दोन चार दिवसा आधीपासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच.‘रेन डान्स' करायचा, हौदात पाणी भरून ठेवायचे, नाहीतर पाण्याचा पाइप लावून रंगांची उधळण करायची असं मनात नक्की ठरवलेलं असेल. पण यंदा जर पाण्याचा गैरवापर टाळू शकलो तर? रंगपंचमीसाठीच नाही तर अगदी पुढचा पाऊस पडेपर्यंत पाणी जपून वापरलं तर? सणाचा आनंद एकत्र येऊन साजरं करण्यात आहे, त्यासाठी कोणालाही त्रास न होता कोरडे आणि अकृत्रिम रंग वापरून पाहिले तर?

काही वर्षांपूर्वी ची होळी आठवून पाहुयात का?




(पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे) होळीचे दोन दिवस म्हणजे धुळवड आणि रंगपंचमी. दोन्ही दिवस मजाचमजा. रात्रभर धगधगून मग शांत झालेल्या होळीच्या राखेत पाणी घातलं जायचं आणि मग तो सगळा चिखल एकमेकांना यथेच्छ फासून धुळवड साजरी करित होते. हा राखेचा चिखल अंगाला का लावायचा तर पुढे येऊ  घातलेला उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून.. चेहऱ्यावरचा तो चिखल धुऊन काढला की माणसं कशी आतून उजळलेली, आनंदी दिसत. मग दुसऱ्या दिवशी यायची ती रंगपंचमी. आम्ही राहायचो येथिल सगळेच लोक मोठय़ा उत्साहाने एकत्र येऊन रंगपंचमी खेळत. त्या दिवसाची सुरुवात मात्र मनावर कायमची कोरेल अशीच व्हायची. पहाटे लवकर उठून, सगळी कामं आटोपून जुनाट पांढ-या कपड्यांवर रंगपंचमी खेळून झाल्यावर खारिक वाट्यांची किंवा बताश्याची माळा गळ्यात घातली जायची   वाडय़ातल्या चौकात मधोमध पाण्याने भरलेला एक छोटा ड्रम असायचा. त्या पाण्यात गुलाल मिसळला की रंग तयार. पाच-सहा मित्रमैत्रिणींमध्ये मिळून एकच पिचकारी असायची..पण आनंद कधी उणावला नाही. माझ्या बालपणाचा एवढा हाच एक रंग आता पर्यंत लक्षात आहे. मी रंगात मिसळायची रंग माझ्यात मिसळायचा...

लहान मुलांसाठी छोटे-छोटे प्लास्टिकचे टब ठेवून त्यात रंग मिसळायचा....  थोडय़ाफार फरकानं याच पद्धतीने आता ही रंगपंचमी साजरी केली जाते.... पाण्याचा नाहक उपसा.. गैरवापर. आपल्याकडे सगळेच सण-उत्सव लहानमोठय़ा प्रमाणावर साजरे करण्याची परंपरा आहे. रोजच्या कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ वेगळा काढून, ताण-तणाव विसरून आनंद उपभोगता यावा, हा खरंतर या सणांचा साधा अर्थ. होळीपुढे उभं राहून खच्चून वाईटसाईट बोलत मनातली भडास होळीत जाळून टाकत मन स्वच्छ करणं असो नाहीतर वय-जात-धर्म-लिंग-आर्थिक स्तर वगैरे सगळे भेद विसरून    मुक्त मनानं एकमेकांना रंगवणं असो, निखळ आनंद देण्याची क्षमता असलेल्या कित्येक प्रथा आपल्यापाशी आहेत. पण आजचं चित्र खूप वेगळं असल्याचं जाणवतंय. मुळात सगळे सण-उत्सव साजरे करण्याला एक प्रकारचं बाजारी स्वरूप आलंय. प्रत्येक सण जसा काही ‘इव्हेंट’ होत चालला आहे. जोरदार खरेदी..गरजेची-बिनगरजेची....कोणता ही सण साजरा करायचा म्हटलं तर  बाजार गाठणं कर्तव्यप्राप्त ठरलंय. सणांसाठी सततचं उसनं अवसान आणताना साधेपणा कुठे हरवलाय? कायमच का सगळं झगझगीत-झकपक हवंहवंसं वाटू लागलंय?आजकाल होळीच्या निमित्ताने कित्येक ठिकाणी 'रेन डान्स' सारखे चैनीचे प्रकार सुरू असतात. होळी-रंगपंचमीच्या पाश्र्वभूमीवर तर रिसॉर्टला जाऊन ‘होली सेलिब्रेट’ करण्याची नवीच पद्धत रूढ होत आहे. थेंबभर पाण्याला महाग झालेल्यांची ही केवढी क्रूर चेष्टा! आमच्याकडे आहे ना मुबलक पाणी, मग आम्ही ते वाट्टेल तसं वापरणार. गाडय़ा धुणार..टेरेस-बाल्कनी धुऊन काढणार, फिल्मस्टार्स करतात म्हणून त्यांच्यासारखीच ‘होली’ खेळून हजारो लिटर पाणी वाया घालवणार..आम्हाला काय त्याचं?..ही बेपर्वा वृत्ती घातक आहे. प्रथा-परंपरांचा अन्वयार्थ नव्यानं समजून घेण्याची वेळ नक्कीच आली आहे. रोजच्या एकसुरी कंटाळवाण्या रूटीनला सुट्टी देऊन स्वत:सोबत घरच्यांना-नातलगांना आणि मित्रपरिवाराला ज्याला ‘क्वालिटी टाइम’ असं छानसं नाव आहे..असा वेळ देणं, भेटत राहणं, आस्थेनं विचारणा करण.....हे समजून घ्यायला हवं. सणांचं ओझं वाटून न घेता फक्त रोजच्या दिवसापेक्षा एक वेगळा आनंदाचा-मजेचा दिवस, इतपत तर आपण करू शकतोच. शिवाय होळी रंगपंचमी म्हटलं की पाण्याचा यथेच्छ वापर केलाच पाहिजे का.. कोरडी रंगपंचमीसुद्धा तेवढाच आनंद देऊ शकत नाही का? पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी आपल्या सणांच्या आनंदावरच गदा आणली पाहिजे असे नाही तर रोजच्या वापरातही आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक करण्याची निकड निर्माण झाली आहे. विविध उद्योगधंद्यांना लागणाऱ्या पाण्याचा वापर कसोशीने सांभाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण राज्यातल्या वेगवेगळ्या गावांत पाण्याची गंभीर अवस्था निर्माण होते आहे.ऐवढच नाही तर... 

होळीतही चांगल्या लाकडे जाळण्यापेक्षा कुडा कचरा, टाकाऊ सामान आधीपासूनच जमा करून ठेवलं तर तो कचराही नष्ट होईल आणि पर्यावरण रक्षण होईल. आज अशाप्रकारची होळी अनेक जण साजरा करायला लागले आहेतच, गरज आहे ती प्रोत्साहनाची. या सगळ्याचा अर्थ असा आजिबात नाही की तन-मन रंगवून टाकणारा हा सुंदर सण साजरा करूच नये. कुठल्याही गोष्टीच्या टोकाला जाण्यापेक्षा सुवर्णमध्य काढणं केव्हाही श्रेयस्कर. आसपासच्या परिस्थितीचं भान राखून पर्यावरणस्नेही असे नैसर्गिक कोरडे रंग वापरता येतील. बाजारात जाऊन आग्रहपूर्वक ते आणायलाच हवेत का? सगळ्या नैसर्गिक रंगछटा सहजपणे मिळून जातात. हळद, पळस, पालक, बीट असे वनस्पतीजन्य रंग बाजारात उपलब्ध असतात. हे रंग वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रंग खेळून झाल्यानंतर ते धुऊन काढायला कृत्रिम रंगांच्या तुलनेत पाणी कमी लागतं आणि लहानमोठय़ा सगळ्यांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हे रंग अगदी सुरक्षित असतात.

वेळीच भानावर येऊन कृती केली नाही तर होळीचे रंगच काय, पण पुरणपोळीसुद्धा गोड वाटणार नाही. एकूणच आपल्या सगळ्यांचीच धडपड रोजचं जगणं अजून चांगलं, आनंदाचं करण्यासाठीच तर आहे ना! आपले सण तर जगण्याचा उत्सव करा अशी शिकवण देणारे..या होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने त्याकडे जरा अधिक सजगतेनं पाहूया का?

पर्यावरणपूरक होळी साजरी झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखलं जाईल आणि होळीचा आनंदही लुटता येईल.

परस्पर स्नेहभाव जोपासणं, तो वृद्धिंगत करणं हे प्रत्येक सणाच्या साजरीकरणामागचं उद्दिष्ट असला पाहिजे. म्हणूनच रंगपंचमी साजरी करत असताना आपल्या अतिउत्साहामुळे रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दुसर्याला रंग लावत असताना त्याच्या आवडी निवडीचाही विचार करायला हवा..होळीच्या नावाखाली एकमेकांना शिवीगाळ करणे, बोंब मारने हे प्रकार थांबविले गले तर फारच उत्तम. आपल्या येणाऱ्या सोनेरी उद्यासाठी झाडांची आणि पाण्याची बचत करण्याचा संकल्प करून ही होळी आणि रंगपंचमी साजरी करुया...


रूचिरा बेटकर,नांदेड.

9970774211

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला