Skip to main content

म्हवळ... ( ग्रामीण कथा ) दत्ता वंजे - नांदेड



दत्ता वंजे लिखित ग्रामीण कथा मव्हळ...

मला चांगलं आठवतयं... तो चैत्राचा महिना अन ते अकरावीचे  दिवसं.. रानात पालव्या फुटलेल्या... अकरावी म्हणलं की सालभर अभ्यासाचा ताणचं नव्हता. म्हणून बापानं उरावर दोन म्हशी करून ठुल्या व्हत्या. बाप ज्या शेतात वाट्यानं काम करायचा, तिथचं म्या बी हे दोन डोबडं अवती भवती फिरवायचो. दिवस चांगला मावळतीला गेला की, म्हशी घराकडं हाणीत हाणीत झाडाझुडपाच्या बुडाला मयी नजर खेळायची. लवनाच्या कडेनं गावात यायची वाट होती. उन्हाळा थोडा  रंगात असल्यामुळे लवनाचं पाणी आटलेलं. काही डोबकाडं तळ गाठलेले तर काही वलाव्याखाली थंडगार जागा असलेले. लवनाच्या कडेने एड्या बाबळीचे बस्तान तर काही रामकाठ्याही होत्या. गावाच्या वरच्या शिवला म्हसोबा, जो आमच्या रोजच्या  वाटतला. म्हसोबाच्या मागे बाभळी मातर लईच होत्या. तिथंच एक पाण्याचा खोलच्या खोल ढवं होता. म्हश्यांना ते माहीत असल्याने, त्या घुसायच्या ढवातं अन पाणी पीत पीतचं बसायच्या फतकल मांडून. मंग आमची झाडाझुडपातली नजर जायची बाभळींच्या शेंड्याकडं.. अन तवा दिसलं एक गच्च म्हवळं.....


   नजरेला म्हवळ दिसताच एकटाच मी हाय रं हाय रं करीत म्हसोबाच्या समोर अंगात आल्यासारखं जोरात वाकडं तिकडं झिंगाट नाचलो.. अन मवा बाप आऊत उभा करून डोळ्यावर आडवा पंजा करीत..( नजरेला ऊन लागू नये म्हणून ) मयाकडं बघायचा..  अन आरोळी  ठोकायचा.. ऐ.... आरं जाय जाय.. ते डोबडं घरी घेऊन जाय आधी... मठा आला म्हवळं झाडणारा.. गां.... ला एखांदी माशी चावलं तवा कळल.. जाय घरी.. बापाच्या आरोळी संपायच्या आधीच मी म्हशायला घेऊन वाटेला लागलो. अन मनात ठरवलं उद्या सकाळी रामपाऱ्यात ह्या म्हवळाचा काटा काढायचाच... आता घरी पोहचलो.. अन उद्याचा दिवस कवा उजडयं याची वाट बघत राहीलो...

   .... म्हशीच्या धारा काढून बापानं दोन्ही म्हशीला भाईरच्या खुट्याला बांधत मला दोनदा आवाज दिला. तसा मी चांगला जागा झालो. तांबडं फुटलं होतं.. रानामध्ये टाळक्या जवारीने चांगलेच आवशान धरल्यामुळं कणंस भरली होती. व पाखरं हाकारणाऱ्या गडी व बायकांचा आवाज अंथरूणावरच येत होता.. म्हणून मी तटकून उठलो.. कारण कालचं म्हवळं स्वस्थ बसू देत नव्हतं.. देवळीतला ढेपसा घेऊन इकडून तिकडं दातावरून बोटं फिरवीत दोन गुळण्यात तोंड धुवून मोकळा झालो... चहासाठी वसरीला टेका देऊन बसताच माईनं चुलीला फुकणीं लावत एका मिन्टात चहाला उकळी आणली.. आरधा गिलास चहा व त्यात मलई हे आमचं रोजचं गरम डीश ठरलेलं.. पण आजच्या चहातल्या मलईची गोडी लागत नव्हती. कारण आज ते फांट्याला  लोंबलेलं म्हवळं चाखायंच होतं. म्हणून गिलासाला पटपट फुरक्या मारून पोटात चहा वतला अन घराभाईर पडलो.. 

      सकाळचे सात वाजलेले.. शेजारचा सखाबा, "अपर्णा" कंपनीचा रेडू कानाला लावून बातम्या आयकत बसला होता. आकाशवाणीच्या बातम्या संपोस्तोर मला सकाबापू जवळच बसून राहावं लागलं.. सांगा बरं मवं सकाबापूकडं काय काम आसल...? मीच सांगतो..  म्हवळ झाडायचं म्हणलं की, दोन बिड्या लागायच्या. अन त्या बिड्या मागण्यासाठी मी सकाबाजवळ बसलो होतो.  बातम्या संपल्या अन सकाबांन रेडू बंद केला. अन मला म्हणाला. काय बापू... काय पाहीजे..? मी म्हणालो दोन बिड्या देकी.. सकाबापू खवळला अन म्हणाला..  बाप्पा.. बिड्या.. अन कायं रं तू कवापसून वडालास बिड्या.. आरं तुया़बापाला सुपारीची तलफ नाही.. अनं तू चक्क बिड्या मागालास.. नाही नाही. म्या देणार  नाही. तुया बापाला कळलं तर आपल्या दोघालाही पायतनांन मारील तो.  मी म्हणालो.. तसं नाही ये सकाबा.. मला म्हवळ झाडायचं हाय..बिड्याचा धूर म्हवळाच्या  माशावर गेल्या की, त्या चावत नाहीत व आंधळ्या होतात.  आरं बापू एवढा खटाटोप  करण्यापरी दोन गवऱ्या घेऊन जाऊन इस्तू कर की.. अस म्हणीत सकाबा घरात निघून गेला. मी गावातल्या पोरासंग कितैकदा म्हवळं झाडली, पण ते फरफर बिड्या वडायचे, म्हवळं उठवायचे. पण हे म्हवळं मला एकट्यालाच झाडायचे होते कस करू... सोयऱ्याच्या निमतानं दुकानदाराकडून रूपायाच्या बिड्या घेवाव की, गवरीचं धूपटन करून म्हवळ झाडाव... मव  डोस्कं काही चलना गेलं..सातवीला असताना मी  कडब्याच्या चिपाडाची केलेली बिडी वडताना बापानं बघितली होती.. अन तितक्याच प्रेमानं मया मुचकाडातं मारलेली झापड पण आठवली.... म्हणून म्हवळं उठवायला मी मनातला बिडीचा नाद सोडलो....व परत घरात आलो...

     हळूच पंगनपसाऱ्याच्या खोलीत घुसुन कत्ती,डब्बी,(काडीपेटी) घेतली. व थोबाडाला माशा डसू नाही म्हणून दोरावर आडकिलेलं बापाचं मोठं उपरणं घेऊन म्हवळाच्या मोहिमेवर शेताकडे निघालो....

घोळदार पॕन्ट अन अंगात ढगळंम आंगडं, गळ्याला उपरणीचा येडा,  हातात कत्ती, खिश्यात डब्बी अशी गावरान देखणी छब्बी करून निघतानाच मायीनं मला  हाटकीलं..

 अन म्हणाली .. "कुठं चलास हातात ही कती बिती धरून...? आन हे बापाच्या टपराचं तू का गुंडाळलास डोस्क्याला..?

 मी म्हणालो...

"माय माय मी म्हवळ झाडायला चल्लो.

" आन संग कोण हाय..? मायीनं भाकरीला उनवनी लावत कौतुकाने इचारलं. 

मी म्हणालो कोणी नाही मी एकटाच चल्लो. मायीनं फाळीवरून एक परात काढली, अन मया हातावर ठुली, अन म्हणाली...जरा संभाळून बापा.. "एखांद म्हवळ लइ आज्याद आसतयं".. अन आपल्या हुडव्यातल्या दोन गवऱ्या संग ने, धुपटन करायला.  आन म्हवळाचा गड्डा काढून घेताना ही परात लाव.. म्हंजी फुटलं बिटलं तरी भोईला सांडत नाही.. सगळं म्हवळ घरलाच घेऊन ये.. "आपनपोट्यावनी एकटाच आदाडू नकोस"... मायीचं आयकून मी संग परात व दोन गवऱ्या घेतल्या व वाटनं लागलो.. . आता मवा अवतार पाहण्यासारखा होता..  मी लागोलाग पावलं म्होरी टाकत गावाला मागे टाकले. गावची पांदनवाटही सरली होती.... चारपाच आउडावर म्हवळाचा ठिकाणा होता. चलता चलता वळईच मुठभर  पाचटही  घेतलं. एकटाच चालत असल्याने गुणगुण करायला कोणीच नव्हतं. तवा मनामधीचं मायीच बोलणं आठवलं.. मी एकटा म्हवळ कसा खाईन बरं ..? पण मायीच्या बोलण्याचा संमदा हेत कळला होता. कारण.. आधी एकदा बाबा न म्हवळं झाडू घरला आणलं होतं तवा त्या खालेल्या म्हळळाच्या चोथ्यापसून मायीन "मेन"  तयार केलं होतं, हे मेन कपाळावर थोडं घासलं की,  मायीच कुंकू खूपच छान लागायचं .. म्हणून मायीला म्हवळापेक्षा मेनाची गरज होती... म्हणून सगळं घरीच आण म्हणून म्हणाली होती....


सकाळचे आठ वाजून गेल्याने पाखरंराखी माणसं परत येत होती. तरी एका टाळक्याच्या वावरात गावातला संभातात्या मळ्यावर ( मांडवावर)  बसून तंबाकूला चुना लाईत बसला होता. मी जवळ जाताच तोंडात तंबाकूचा बकमा मारून पतराच्या डब्यावर डबडब वाजवत जोरजोरात आरोळ्या ठोकायला लागला.. मधीच दम घेत मला  इचारलचं.. काय दत्तराव.. कुठं..? मी म्हणालो कुठं ही नाही..! एरीच बाबकडं निघालो..  तरी मया हातातली परात व गवरी बघून त्याला अंदाज आलाच असेल.. त्याला कट हाणून मी लवनाला येऊन पोहचलो. आता म्हवळ आउडभरच पुढं होतं.. लवन संपल गावची शिव आली. म्हसोबाला नकळत हात जोडीत, म्हवळाकडं झपझप चालायला लागलो... बाप मया अगोदरच रानात येऊन आऊत जुपुन बसला होतां. "शिराळाचं काम चांगलं उरकतयं पुन्हा ऊन वाढलं की, लिंबाखाली आराम करता येतयं असा बापाच्या कामाचा नेम होता"...  मी बापाची नजर चुकवून म्हवळाच्या झाडापाशी पोहचलो. 

      मस्त बाभळीच्या झाडाला म्हवळं लोंबलेलं होतं.. मायीच्या हाताच्या भाकरीवानी त्याचा आकार होता. म्हवळाकडं बघत आजीच्या सास्तराची जरासी आठवण झाली.. आजी निजताना  रातच्याला सास्तरं सांगायची शिकवायची..    ""डमं दीक्कं मधी पिक्क वरी बिया""    हे आजीने हमेशा म्हणलेलं सास्तर आज त्या म्हवळाकडं बघून आठवलं होतं.. व तसचं दिसतही होतं ... डम्म मधानं भरलेलं म्हवळं मधून पिकलेलं.. व वरी माशा म्हणजेच बिया.. आजी सास्तरं कवा कोणत्या काळात शिकली आसलं याच इच्यारात मी पाच मिन्ट पडलो होतो... 

   ऊन चांगलचं आता चमकू लागलं होतं. आजून जर उशीर केला तर माशांचा चावा अन धूर मला सुधरू द्यायचा नाही म्हणून आता चाल करायची होती. तसं बाभळीच्या झाडाला बसलेल म्हवळ गरीब माशांचच असतयं हे माहीत होतं. माशा थोड्या तांबड्या जातीच्या आसत्या तर माणसाचा वासही पडू देत नाहीत. सरळचं अगावर चवताळून येतात.. हे अनुभवाचा अभ्यास दोस्तासंग झाला होता.. 

    म्हवळ असलेले बाभळीचे झाड मयासारखं रानात एकलकोंडं नव्हतं. शिवच्या म्हसोबामागे असलेला अनेक बाभळीत हे एक फांट्यात फांटे आडकून घेऊन उभा होतं.. एखांद्या गावात गच्च भावकीचा वाडा असावा असाच काही भास होत होता. मी झाडाखाली गेलो होतो. आजुबाजूच्या तनगटान ,अन वाळलेल्या पानसऱ्या गवतांन राज्य तयार केले होते. ढवांतलं पाणी, गवत, अन थंडगार सावली असा  तिहेरी संगमच बाभळीभौवती जमला होता. मिरगापसून ते चैत्रापस्तोर त्या काटाड्यात कोणी  गेलं नसावं म्हणून की काय, तिथं  आयचन तितकच माजलं होतं. मी काल फकत म्हवळ बघितलं होतं, म्हणून  आयचनात ध्यान गेलचं नाही. हातातल्या कत्तीन आजूबाजूचे फांटे दमदम  साळायला सुरवात केली. म्हवळ मया डोस्क्यावर हातभरच वरी होतं.. म्हवळाच्या गड्ड्याचा फांटा न्याहळत दमानं  जागा बदलाय गेलो तरं.. दुसऱ्या बारीक  झुडपातून चित्तर होतं की ल्हावरूं माहीत नाही परीक ते मातर भूरररर करीत उडून गेलं .. त्याचा आवाज चाळ्यातच घुमला. तवा मयी फांटे साळायची गती थोडी थांबली. बाभळीच्या वर्लाकून पाच पंचीस हात लांबून कापसाचे रिकामे झालेले रान होते.. मी जसाही बाभळीच्या बुडाला चिटकलो होतो.. तवापसून टिवटिवी सारखीच आभाळात इमानासारखी  घिरट्या मारून कल्ला करीत होती. जसे काय तिचे मी अंडे चोरायला आलो, नाहीतर मग आमचं जस काय जन्माचं वयीरंच होतं.. असा तिचा गावभर गल्का सुरू होता.


 थोडं थांबून मी तिथल्याचं कुइजट काड्याकुड्या उजव्या पायानं सारल्या, काड्याखाली संग आणलेलं पाचट खुपशीलं, पाचटीवर दोन गवऱ्या ठुल्या..खिशातून गोपालचं चित्र आसलेली डब्बी काढली. अन काढंकुन एक काडी घासली. काडीच्या गुलालाचा वास आधी मयाच नाकात शिरला अन पाचटीन जाळ धरला. काड्याही तडतड तडतड जळायला लागल्या. म्हवळ मातर अजूनही निपचीत  लोंबत  होते. जाळानं आपलं आंग पसरलं होतं. गवऱ्या धुपायला लागल्या होत्या. आता चांगल्याच धुपल्याही होत्या. अंगावर आणलेलं बापाचं उपरणं तोंडाला झाकून धरलं. एक धुपती गवरी.. झाडाच्या बुडाला ठुवुन, दुसरी मी हातात धरली, दमन म्हवळाच्या पोळीजवळ नेली. माशांची आता थोडी कुजबुज झाली.. मया पायाची दोन्ही पंजे वर करूकरू मयी उंची वाडविण्याचा मोठा प्रयत्न सुरू होता. अंगाचा तोल संभाळतो तेच, एका बारीक इस्त्याचा चुटका पायाला बसला.. वरच्या हातातली गवरी आरधी मोडून तोंडावरून खाली पडली. गवरी संभाळण्यात कत्तीचा हिसका  फांट्याला बसला अन म्हवळ सगळं बावचलं.. खालच्या माशा वरी.. वरच्या माशा खाली असा त्यांचा खेळ सुरू झाला. आता माशाच मध पिऊन घेतील म्हणून पटपट पुन्हा जाळ केला.बाभळीच्या बुडाला बेसुमार धूर झाला. मी कत्तीन मेन फांटा हालक्याचालीत हालवला. खालुन धूपटन.. उजव्या हातात कत्ती.. डाव्या हातात गवरी.. म्हवळाला संकट कळालं होतं. धुराच्या जोरापुडं माशांचा काहीच लाग होऊ नाही.. आरद्या माशा वरी उडाल्या. आरद्या इकडून तिकडं भिंगऱ्या घालायला लागल्या.. म्हवळाचा गड्डा लसलसीत दिसत होता. चांगलं डेचकी भरून जमल म्हणून मनात खूशीच मावना. गालरून घाम सरकला. मयेमला दोन्ही होटं तोंडात दाबून, आता कत्तीन जोरात हिसका मारला, गड्ड्यातून दुसऱ्या फांट्याची बारीक काडी घुसलेली. तिनचं घाटा केला. गड्डा मधातून फुटला. ""घरात सोयरीन बोलवाव अन तीनचं घर फोडून जावाव असच वाटलं"".. 

    मायीन संगं देलेली परात वर उचलली. धुपटन जरा पातळ झाल्याने,  दोन मावश्या ( माशा ) आल्याच की धावून,  एकीन कपाळाला तर एकीन गालला चावल्याच.. मी धूपटन वाढीलं.. परात तशीच हातात.. परातीत मध गळू लागला.मया मायीला मनातच धन्यवाद देलो. "परात नसती तर मलाच तोंड वासून बसावं लागल आसतं".. 

     मेन फांट्यावर डकन्या हातानं कत्ती मारली,ताकत पोवचत नसल्याने उशीर होत होता. बाराणे माशा वरीच घोंगावत होत्या तर च्याराने माशा आजुक म्हवळाला चिटकू लागल्या. ""मया कत्तीच्या ठ्याक्यानं परातीमधीच माशाचे बोचकेच्या बोचके पडू लागले""  धुपटनानं खरच त्या आंधळ्या झालत्या. तरी यायच्याच अंगावर. मी गवरी फिरवी' दुसरी येई. मी उपरणीने झटकून हाणले की तिसरी माशी येई.. जस या आरण्यकांडात मव अन माशांच युद्धकांडचं सुरू होतं... पण आपण नाही हारलो. आखरीला गड्डा हाताला लागलाचं. आमरताचा घढा मिळाव तसा आनंद झाल्ता. तस निम्म म्हवळ फुटलं होत. काढीचा भाग उरला होता. आंड्याची पोळी बाभळीवरच हिबाळून मी काढता पाय घेतला. आंड्याच्या पोळीवर माशा जमत होत्या, स्थलांतरीत गावापरमानं...


 संमद म्हवळं झाडून वावरातल्या गाडी आकारीला येऊन थांबलो.नऊ साडेनऊ वाजून गेले होते. बापाचं आऊत चालुच व्हतं. हातातल्या कत्तीन गड्डयाचा फांदोरा दोन्हींकडून ईत ईत आंतरानं छाटला. आरधं म्हवळ  आधीच परातीत जमा होतं, त्यावर ह्या गड्डयाचा फांटा ठूवून मधात फसलेल्या माश्या येचूयेचू भाईर फेकल्या. आता ताट शुद्ध झालं होतं. डोसक्याची उपरणी काढून, चौकोनी घडी करत म्हवळावर झाकली. संमदं ताट झाकून घराकडं निघाव म्हंणताचं बापाची नजर मयावर पडलीच.. तरीबी मी पुढं पाऊल टाकाव म्हणली की, बापान  मवाळ आरोळी देली..

"बाळा.. ये पोरा... झालं का बापू  म्हऊळ झाडून..? झाडाखालचा इस्तू बिस्तू इजीलास की...?  नाही तर धूपून धूपून सगळा हेंडगा फिरनं उन्हाचा...!

आसं म्हणीत बाबा दोन मिन्टात  लिंबाखालचं गार पाण्यानं भरलेलं बिनगं" घेऊन आला.. मी धा पाऊल बापाकडं सरकलो. रामकाठीखाली उभा झालो. बाप बी जवळ आला. पाण्याचं बिनगं टेकीलं. बिनग्या संगचा जरमनंचा गिलास भरून पाणी वतलं, अन गिलास मया हातात  देला. अन म्हणाला... जाय त्या इस्त्यावर हे पाणी शीपड.. काही राहीलं साहील तर इजून जाईल.. मी तसंच गेलो पाणी शिपडून आलो. येता येता समंद्या माशावर नजर गेली. आंड्याच्या पोळीवर सगळ्या जमल्या होत्या...

 

   बापान.. बिनग्यातून दुसरा गिलास भरला. गिलास भरताना पाण्याला थोडा फुंकारा मारलां.. पहिल्या गिलासाला नाही मारला, पण दुसऱ्या गिलासाला मारला.. अन तो गिलास मयाकडं सरकीत म्हणाला... हंग पाणी पी.. मठा दमला आसशील... तस मीही तहान ईजून गेलोच व्हतो.. एकावर एक दोन गिलास चडविले.  पोटात गारगार  वाटत होतं.. चवथा गिलास भरून मग बापान पिला. रामकाठीच्या बुडाला दोघ बाप ल्योक  पाच धा मिन्ट बसल्या. बापान हळूच उपरणीचा कोंटा उचलून म्हवळाच्या गड्डयाला  बघितलं....  अन म्हणाला..  आरं... फुटलं काय..!  तरी  थोड माशांनी पिलचं वाटालयं..!  बर जाऊदे.. आसल्या आयचनात उद्योग करीत जाऊ नको..  इकडं आउताच एक बइल फिरलं होतं. तर दुसरं खाली बसलं होतं.. त्यांची थोडी करामत बघून मला थोडं हसूच आल...  बाप म्हणाला.. चला ऊन तापालयं.. अन जनावरं बी लफलफ करालेत.. तू चल म्होरी... मी चार पाच तासं मारून, येतो न्याहरीला तुया मागं मागं... अस म्हणीत बाप तटकून उठला. धोतराच्या पालाचे इकून तिकडं आचेकोचे खवले.. अन हातात बिनगं घेऊन परतला..  मी म्हवळाच ताट उचलुन चलायला लागलो... बापान आधी मला पाणी देऊन नंतर आपण पिलं.. तेचा मयातला जीव किती.. ह्या इचारात.. आरधी वाट कवा सरली पत्ताच लागला नाही.... 


      लगलग चलण्याने गाव जवळ आलं..गहू हरभऱ्याच्या  सुग्या करणाऱ्या  बाया माणसं रानात निघताना वाटत आढळतं होती... गावात कोणालाही हाटकून बोलणारी म्हतारी गंगामाय अचानक मयाही पुढं आलीच.. म्हणाली.. काय व्हय दत्तोबा..! काय आणलं की झाकून..! मी म्हणालो म्हवळ हाय म्हवळ ... ये घराकडं..! तुलाबी देतो उलीसक...  म्हवळ हाय व्हय... आरं एक म्हवळं झाडनं म्हणजे एक गाव उठीणं हाय रं* नाकात नस वडीत बोललेल्या.. गंगामायीचे शब्द मनाला चरपाटून लागले होते.. तरीही मी चलण्याची इस्पीड वाडवली होती. कारण गंगामायचा काही भरोसा नव्हता.. काही तरी सांगून  आरधा निम्मा म्हवळाचा गड्डा काढून घ्या सारखी होती ती... आता घर जवळ आली.. भाईरच्या खुट्याला बांधलेल्या एका म्हशीची पाठ ऊन्हान किती गरम झाली म्हणून लहाना भाऊ तिच्या पाठीवर पाणी ओतत होता.. दुसरी म्हसड रोत करीत डोळे मोठे करून मान फिरवून मयाकडं बघत होती. जसा का तिलाच मी गड्डा आणलाय..... मनालाच हसून... उसासा टाकीत अंगणात पवचलो...


  माय आंगणातल्या धोंड्यावर लुगड्याला  सोडा लावुन घसाटे मारीत मारीत मला म्हणाली... " ठुई ते ताट तसच उकळाजवळ" अन अंगाला पाणी लाव आधी.. बाप तर कवा येतयं की.. तुमच्या गोंधळात मये संमदे कामं करायला बारा वाजालेत. मी पटकून न्हानी गाठली.. चार तांब्यात आंग वलं करीत फिरेस झालो. केसांना चांगभांग करीत मया मनात एकच  इचार खेळत व्हता.. की म्हवळावर तावं कवा मारायचा..?


     जरासं इकडं तिकडं करीत आरधा घंटा टाइमपास झाला. बापान घरी येऊन आंघोळही केली. मी भाऊ माय बाप चौघं न्याहरीला बसलो. माईन वांग्याच भरीत'न भाकरी केल्या होत्या. बापान बुक्कीत तांबडा कांदा फोडून, दोघा भावंडाकड फोडी हिबाळल्या.. अन  म्हवळाच ताट माईन उचलून सगळ्यांचा मदीठुलं.  संगच माईन एक चमचा घेतला. फांदीचा उरलेला गड्डा खरडून काढला किलो दिडकिलोचा माल ताटात दिसत होता.  ह्या कागदावर खालेला सगळा चौथा टाका बघा, म्हणीत माईन साखरच्या पुड्याचा कागद म्होरी पइस केला.. जेवनापेक्षा म्हवळावरचं आमचा दणका सुरू होता. म्हवळ संपत होतं. उष्टा चोथा जमत होता.  एक म्हवळं झाडणं म्हणजे एक गावं उठीणं हाय बघं.. ह्या गंगामायीच्या शब्दानं "म्हवळाचा घास काही नरड्यातून खाली उतरत नव्हता


दत्ता वंजे नांदेड

९२७०३६०८२९

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला