Skip to main content

मा. अशोक कुबडे यांनी अव्यक्त अबोली राज्यस्तरीय साहित्य संमेलन मंचावरून साधलेला संवाद

  


आज अव्यक्त अबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मी आपल्याशी संवाद साधणार आहे.

महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे, महात्मा गांधी, बाबा आमटे....यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. 


मी ज्या भूमीतून आलेलो आहे ती मराठवाड्यातील नांदेडनगरी आहे..जी की, गुरुगोविंदसिंगजी यांच्या पदस्पर्शाने पावन आणि गोदावरीच्या खळखळ पाण्याने पवित्र झालेली आहे.

 

आज 17 सप्टेंबर मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन. आज मराठवाडा-हैदराबाद निजामाच्या तावडीतून मुक्त झाले.

मराठवाड्याला जुलमी निजामाच्या तावडीतून जाचातून मुक्त करण्यासाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांना आणि ज्यांनी प्राणपणाने लढा दिला ते.. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, हुतात्मा पानसरे, आदी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो...

1947 ला भारत स्वतंत्र झाला. सर्व भारतातली संस्थाने खालसा करण्यात आली.. पण हैदराबाद येथील जुलमी निजाम आपलं साम्राज्य संपवण्यासाठी तयार नव्हता.. त्यावेळेला पोलीस ॲक्शन करून त्याच्या विरोधात मोठा संग्राम निर्माण झाला आणि यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या बलिदान दिले..त्या सर्व माता भगिनी, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो..


ज्या पावन भूमीत आज अव्यक्त अबोली या साहित्य संस्थेच्या वतीने चौथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन होत आहे ही वर्धा जिल्ह्याची नगरी आपल्या ऐतिहासिक परंपरेने समृद्ध असलेली नगरी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या झंजावाती कीर्तनाने आणि भजनांनी ही एकेकाळी दुमदुमून गेलेली पवित्र नगरी आहे. या जिल्ह्यात गावोगावी तुकडोजी महाराज, गाडगेबाबांच्या विचारांच्या पावलांचे ठसे आहेत.. त्यांच्या विचारांची पताका ..त्यांच्या विचारांची प्रेरणा या परिसरात आणि सबंध महाराष्ट्र आणि देशात कायम आहे..


*तुझे गावच नाही का तीर्थ रं।*

 *बाबा रिकाम कशाला फिरत..!*


असे मार्मिक आणि उद्बोधक विचार गाडगेबाबांनी सबंध समाजाला दिले. तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून सबंध गावातील अंधश्रद्धा, अज्ञान, भुताटकी अशा वाईट सवयींवर आपल्या ग्रामगीतेतून मार्गदर्शन केलं. महात्मा गांधी आणि आपल्या भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे सर्व नियोजन आणि स्वातंत्र्यसंग्रामाची आखणी वर्धा जिल्ह्यातून केली. सेवाग्राममधून महात्मा गांधीजींनी देशाच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केलं.. वर्धा जिल्ह्यातून त्यांनी 'भारत छोडो' या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीची मोर्चेबांधणी केली. अशी ही पावन भूमी सुरुवातीला शेगाव नंतर सेवाग्राम अशा नावात बदलली गेली पुढे याच वर्धा जिल्ह्याला "गांधीजींचा जिल्हा" म्हणून ओळखले जाऊ लागले.

1936 साली महात्मा गांधी वर्ध्याला आले. 1936 ते 1946 ही दहा वर्षे बापूंनी या सेवाग्राममध्ये वास्तव्य केलं.. या काळात झालेल्या चळवळी तेव्हा झालेली आंदोलने आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या विविध बैठका त्यांनी सेवाग्राममध्ये आयोजित केल्या आणि सबंध देशाचे नेतृत्व या मातीतून केलं.. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलांना आझाद, इंदिरा गांधी आणि विदेशी पाहुणे अशा अनेक राष्ट्रीय नेत्यांनी बापूच्या भेटीसाठी अनेक वेळा वर्धा येथे आले. तसेच वास्तव्य करून राहिले..


1946 ला गाधीजी वर्ध्यातून दिल्लीला रवाना झाले. वर्ध्यातून जाताना बापूंनी इथल्या लोकांना वचन दिलं की मी आपणास स्वातंत्र्य प्राप्त करून देऊनच भेटीसाठी येणार आहे आणि बापू दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर 1946 ते 1947 या वर्षभराच्या अथक रणसंग्रामाने भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. गांधीजींना इकडं भेटीसाठी यायचं होतं..वर्धेच्या भूमीत पुन्हा त्यांना पाऊल ठेवायचं होतं. वर्धा नगरीसुद्धा त्यांच्या स्वागतासाठी तयार आणि सज्ज होती पण नियतीला काही वेगळं मंजूर होतं आणि महात्मा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.. त्यांची पुन्हा वर्धा येथे येण्याची इच्छा राहून गेली. वर्धा येथील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी केलेली तयारी होती.. पण भारतीय स्वातंत्र्याचा जल्लोष त्यांना बापूविना साजरा करावा लागला.

     खूप मोठी परंपरा या वर्धा जिल्ह्याला आहे..अनेक संत परंपरेचे वास्तव्य जिल्ह्यातून पुढे आलेले आहे. विनोबा भावे यांच्या पवनार येथील आश्रमातून क्रांतीची ऊर्जा मिळते. एक विचारांचा प्रेरणादायी स्त्रोत म्हणजे विनोबा भावे यांचा पावनार येथील आश्रम आहे. विनोबा भावे यांनी संपूर्ण भारतभर वास्तव्य केलं..आणि संपूर्ण भारतभर ते पायी फिरले. जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी असं भारतभर त्यांनी भ्रमण केलं. त्यां





च्या या भ्रमणाच्या चळवळीचे ध्येय होतं 'भूदान' चळवळ. ज्या लोकांकडे अनेक मोठ्या मोठ्या जमिनी आहेत..त्या लोकांच्या जमिनी. त्यातून काही जमिनीचा तुकडा हस्तगत करायचा. ते दान म्हणून घ्यायची आणि ज्यांना गावांमध्ये थोडीसुद्धा जमीन नाही.. पाऊल ठेवायला जागा नाही.. अशा लोकांना विनोबा भावे यांच्या या भूदान चळवळीने थोडीफार जमीन मिळाली. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांनी भूदान करायची.. जमीन दान द्यायची आणि ज्यांना नाही त्यांना ती प्रदान करायची ही खूप सुंदर अशी चळवळ विनोबाजींनी राबवली. एक महान संत म्हणून त्यांची ओळख सबंध भारताला आहे...एवढेच नाही तर श्रीमद्भागवत गीता

गीतेवरील गेय स्वरूपातील  ग्रंथ "गीताई" म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या आईला त्यांनी गीता संस्कृत मधून आहे ती कळणार नाही म्हणून त्यांनी त्या गीतेचं  कवितेच्या स्वरूपात निर्माण केलं आणि आपल्या आईला त्यांनी ते गीता ऐकवली. आपल्याला या वर्धा जिल्ह्याच्या पवित्र पावन भूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्यांना जमनालाल बजाज यांनी त्यांची जी गीताई वचन आहेत लिहिलेली. कडवे आहेत... त्याच्या ओळी आहेत त्याच्यासाठी स्पेशल असा एका संगमरवरी असा दगडावर त्यांनी ती प्रत्येक ओवी कोरून ठेवलेले आहे आणि फार मोठे असे पर्यटन स्थळ तयार केलेले आहे. हे जमनालाल बजाज या उद्योगपती यांनी केलेले आहे. मोठी दातृत्व असलेली समाजाप्रती काहीतरी देण्याची त्यांची प्रचंड मोठी इच्छाशक्ती असणारी माणसं या मातीत जन्माला आली आणि म्हणून या मातीचे सोनं झालं. तुकडोजी महाराज, गाडगेबाबा या सर्वच संत महंत यांच्या पावनभूमीने ही पावन झालेली आहे. थोडं पुढे गेल्यानंतर वरोरा आहे. बाबा आमटे यांचा आश्रम आहे. त्या आश्रमात त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन फुलवलं. आनंदवनच्या स्वरूपात त्यांनी या समाजातील कुष्ठरोग्यांना खूप मोठा आधार दिला. त्यांना राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांच्या रूक्ष असलेल्या या जीवनामध्ये फुलबाग फुलवण्याचं काम केलेले आहे. माणसाने आयुष्यामध्ये येऊन हेच ठिकाण पाहिले पाहिजे. आजची आपली संस्कृती ही शेजाऱ्याला एक रुपयासुद्धा कधी देण्याची मानसिकता राहिलेली नाही. एवढंच नाही तर कुणाच्यातरी कामे आपण पडावं हे आपण आता आपले संस्कार विसरून चाललो आहोत पण अशा परिस्थितीमध्ये विनोबा भावे, बाबा आमटे, प्रकाश आमटे, विकास आमटे अशा महान विभूतींनी आपण समाजाचं काही देणं लागतो. या पृथ्वीतलावर आपण जन्म घेतला आपल्याला काहीतरी याचं देणं आहे. समाजाप्रति आपली काहीतरी कटिबद्धता आहे बांधिलकी आहे. आणि ते आपण काम केले पाहिजे हे त्यांनी मनाशी ठरविले.  आणि झपाटून काम केले आणि या समाजाला आनंदवन सारखा आश्रम दिला. हेमलकसा येथे त्यांनी त्यांची दुसरी शाखा काढली. पुढे गेल्यानंतर नागपूर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षाभूमी म्हणून ती सर्वदूर परिचित आहे.


समाजव्यवस्थेतील अनिष्ट रूढी परंपरा पाहून माणसाला माणसासारखे जगू दिले जात नाही हे पाहण्यात आल्यानंतर पेटून उठून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिल 1956 साली नागपूर येथे दीक्षा घेतली. तो क्रांतिकारी परिसर आहे. सेवाग्राम पवनार, वरोरा, विश्वशांती स्तूप, गीताई मंदिर, लक्ष्मी नारायण मंदिर, बजाज वाडी, गांधी चौक अशी विचाराने ओतप्रोत भरलेली प्रेरणास्थळे या भागात आहेत. हे साहित्य संमेलन या विचारांच्या या महापुरुषांच्या विचाराने समृद्ध असे झालेले आहे. एक महत्त्वाचे संमेलन म्हणून या संबंधाकडे पाहता येईल.  महापुरुषांचा हा परिसर त्यांची कर्मभूमी म्हणून एक विशेष आकर्षण आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, वाशिम, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्वच परिसरातील महापुरुषांच्या आठवणी या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला येत आहेत. त्यांच्या विचारांची पताका या पद्धतीने सर्वदूर येऊन पोहोचली आहे. त्याच पद्धतीने त्यांची पताका अजून पुढे घेऊन जाण्यासाठी बळावली हेही एक विचार मी या ठिकाणी सर्वांपुढे ठेवत आहे.

     साहित्य संमेलनाच्या माध्यमातून अनेक महापुरुषांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे.. त्याचबरोबर ही संस्कृती समृद्ध करण्याचे काम केले आहे. बोलीभाषा आपण बोलतो त्यावरच आपले साहित्य निर्माण असतं. आपण आपल्या बोलीतून साहित्य निर्माण करतो. आणि परिसरातील भाषा शब्द बोली ती साहित्यामध्ये उतरत असते. तीच लिहिण्याचं काम साहित्य करीत असते. आणि मला वाटते..याच परिसरात झाडीबोली या बोलीभाषेचे साहित्य संमेलन झालं. आदिवासी आणि अन्य काही जाती जमाती झाडी बोली बोलतात. त्या झाडीबोली बोलणाऱ्या साहित्यिक लेखकांचे साहित्य संमेलन या परिसरात आयोजित करण्यात आले होते. तशी माझी मित्रमंडळी भरपूर आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर हा सर्वच परिसर माझ्या मैत्रीपूर्ण वातावरणाने भारावून गेलेला आहे. आजच्या या पुलगावच्या अव्यक्त अबोल  साहित्य संमेलनासाठी मला या पावन स्मृतींनी आकर्षित करून ओढून आणलेले आहे... म्हणून मी या संमेला येण्यासाठी आतुरलोही होतो. संयोजकांनी मला ती संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे..

     तर ...मी सांगत होतो..झाडीबोली हे साहित्य संमेलन अगदी त्या भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांचे संमेलन आहे.. जर अशी संमेलने आपापल्या बोली भाषेत झाली. आपण जी भाषा बोलतो..त्या भाषेत आपला संवाद होतो.. म्हणजे मातृभाषा आणि जमातीतील बोलीभाषा आणि त्यांचे साहित्य संमेलन घेणे आवश्यक आहे. आपणही त्याच दिशेने वाटचाल करत आहोत. आता प्रत्येक बोली भाषेचे साहित्य संमेलन होऊ लागले आहेत. तसं तर प्रत्येक जाती आणि धर्माचीसुद्धा साहित्य संमेलने होऊ लागली आहेत.. या संमेलनाबाबत काही लोकांचे मतप्रवाह वेगवेगळे आहेत. त्याचबरोबर संत आणि विचारप्रवाहाची सुद्धा वेगवेगळी साहित्य संमेलने होत आहेत. एकीकडे आपण जरी अशी वेगवेगळे साहित्य संमेलने न करता एकत्रित करावे असे वाटत असेल पण दुसरा एक विचार असा येतो की या छोट्या मोठ्या साहित्य संमेलनाने ही मराठी मातृभाषा जी भाषा मराठी आहे. ती आज बोलली गेली पाहिजे. ती कुठेतरी आज मागे पडताना दिसते आहे..

आई-वडिलांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये टाकण्याचा मोह आवरत नाही. त्यातून आपली मुलं मराठी भाषेत टाकण्याऐवजी ती इंग्रजी भाषेत टाकतात आणि त्यातून काय होतं त्या सर्वांना माहीतच आहे तरी देखील त्यातून मराठी भाषा त्याला आली पाहिजे यासाठी आई-वडिलांनीसुद्धा प्रयत्न करावा आणि पुन्हा मराठी भाषेतून शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा एवढेच नाही तर मराठी भाषा ही पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यातले शब्द आज नाहीसे होत आहेत. जे शब्द आज दुरापास्त होत आहेत. आपण ते वापरत नाही त्यामुळे ते शब्द बाद होत आहेत.. नष्ट होत आहेत..त्यातून आपली मराठी बोलीभाषा ही मागे पडत आहे असेही या ठिकाणी मला वाटतं. खरंतर बोलीभाषा ही ज्ञानदायी भाषा झाली पाहिजे आणि आता ती होऊ लागली आहे असेही आपण याठिकाणी म्हणायला हरकत नाही. या भाषा आपापल्या मातीतील जमातीतील आपल्यासाठी.. संवादासाठी वापरली जाते. भाषेतून संवाद निर्माण होतो. संवाद निर्माण  होण्यासाठी लागणार आहेत  रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणू ते म्हणजे भाषा आहे. शब्द आहेत आणि ते जर समृद्ध असतील तर आपणही समृद्ध आहोत यात शंकाच नाही...

     संवाद हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे..संवाद नसेल तर आपण नाही. आजकाल संवाद हरवत चालला आहे..मोबाईल तंत्रज्ञानाच्या आणि टीव्हीच्या जगामध्ये आपण संवादाकडे दुर्लक्ष केलेले आहे. तसं पाहिलं तर संवाद हा आपल्यात होत नाही. त्याचे अनेक कारणे आहेत. त्याची कारणे शोधायला गेलो तर आज आपण अनेक कारणे सांगू शकतो. पण संवाद हा कमी झाला..घराघरात मोबाईलची संख्या वाढली आहे..हे आपल्याला मान्य करणे आवश्यकच आहे. थोडाफार काही कंपन्यांनी, काही पालक, शिक्षक आणि समाज या सर्वांनीच मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जर आपण मराठी भाषा बोललीच नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी ते खूप घातक असणार आहे. म्हणून ते आपण केलं पाहिजे. आपापल्या परिसरात होणारी ही भाषिक संमेलने किंवा जिल्हास्तरावर आधारित साहित्य संमेलन किंवा प्रांतावरील होणारे साहित्य संमेलने मराठी भाषेच्या समृद्धीची गतिमान चक्रे

 आहेत. आणि ती या साहित्य संमेलनाने फिरली पाहिजे. मराठी भाषेचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बोलीभाषा हीमहत्त्वाची आहे. आपल्या बोलीभाषेतील अनेक शब्द गहाळ होत आहेत. दूर जात आहेत. ती कायम ठेवली पाहिजे. यासाठी आपण आपल्या लेखात बोलीभाषा वापरली पाहिजे.

मराठी भाषा ही अभिजात भाषा हवी यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न केलेही पाहिजेत त्यासाठी लागणारा निकष आपण पाळला पाहिजे......पण अनेक अडचणी आहेत.



पूर्वी पुस्तके ही आपल्या बोलीभाषेतून आपल्याला वाचायला मिळायची.. पण आता मालिका आणि चित्रपटानेसुद्धा बोली भाषेतून चित्रपट आणि मालिका साकार करण्याची एक परंपरा सुरू केलेली आहे आणि या परंपरेतून अनेक मालिका आणि चित्रपट हे एखाद्या परिसरातील बोलीभाषेतून एखाद्या जाती-जमातीच्या बोलीभाषेतून ते साकार करण्याचं काम सुरू केले आहे - जसे की आपण पाहतो की शेगावच्या गजानन महाराजांबद्दल सिरीयल आहे तर त्या सिरीयलमध्ये अगदी सुटेबल असा छान परिसर तशीच ती त्या परिसरातील बोलीभाषा वापरलेली आहे "तानी" नावाचा चित्रपट आपण सर्वांनी पाहिला असेल त्या चित्रपटांमध्ये विदर्भातली बोलीभाषा वापरण्यात आलेली आहे. अनेक मालिकांमध्येसुद्धा काही कॅरेक्टरची कोल्हापूर, सोलापूर किंवा विदर्भ व अहिराणी भाषेतील किंवा इकडं आपल्या मराठवाड्यात बोलीभाषेतील वेगळ्या बोलीभाषेतील कलाकारांना त्यातच स्थान देऊन त्यामध्ये ती बोलीभाषा वापरली जात आहे. मग साहित्यातील हा प्रयोग आता मालिका आणि चित्रपटांनी घेतलेला आहे आणि साहित्यिकांनी प्रमाण भाषेकडे लिहिण्याचं आपलं प्रमाण सुरू केलेलं आहे तर अनेक कादंबऱ्या या आपल्याकडे असतील किंवा कथासंग्रह असतील किंवा कोणतीही भाषा असेल किंवा कविता असतील या बोलीभाषेतून आपल्याला वाचायला मिळत होत्या फार सुंदर अशा कथा अण्णा भाऊ साठे यांच्या आहेत..'माकडीचा माळ'मध्ये जी भाषा वापरलेली आहे अगदी त्या माळरानावरल्या इतर ज्या भटक्या जमाती आहेत त्यामध्ये पारधी असेल माकडवाला असेल किंवा गारुडी असेल किंवा माकडाचा खेळ करणारा मदारी असेल अशा विविध ज्या जमाती आहेत त्या जमातींचे चित्रण मांडलेले आहे.. आणि त्यातून त्यांनी ती बोलीभाषा मांडलेली आहे. मग त्या बोलीभाषेमुळे तो चित्रपट असेल ती कादंबरी असेल खूप सुंदर झालेली आहे. तसेच आपल्याकडे सांगता येतील 'वडार वेदना' म्हणून लक्ष्मण गायकवाड यांची कादंबरी आहे तीही त्याच पद्धतीची सुंदर अशी कादंबरी आहे 'बिऱ्हाड नावाची अशोक पवार यांची कादंबरी खूप सुंदर बोलीभाषेतून आहे. म्हणजे आपल्या बोलीभाषेतून दिलेले साहित्य हे दर्जेदार आणि सकस असतं त्यात कुठलीही शंका नाही. मला अनेकांनी प्रश्न विचारला की, 'तुमची बोलीभाषा आणि तुमच्या बोली भाषेवर तुमची 'गोंडर' कादंबरी आहे का?' मी त्यांना सांगितलं की 'भाऊ, ज्या गावात मी जन्मलो ज्या व्यवस्थेत मी जन्मलो ज्या परिसरात मी जन्मलो त्या परिसराचं सचित्र वर्णन त्या कादंबरीत आलेले आहे आणि कोणताही लेखक असो हेच करत असतो. आपल्या परिसराचं किंवा आपल्या बोलीभाषेचं त्यावर त्याचं प्रतिबिंब उमटत असतं म्हणजे की एखादा लेखक लिहितो आणि त्याला जर परिसर लिहायचा असेल किंवा आजूबाजूचं वातावरण लिहायचं असेल तर लेखक आपल्या डोळ्यासमोर त्याचा गाव असेल किंवा त्याच्या आजूबाजूचा परिसर असेल तो घेऊन येत असतो आणि त्याला तो खुणावतो लिहिण्यासाठी, त्याला लिहिण्यासाठी त्याच ठिकाणी मटेरियल किंवा बरंच काही मिळत असतं आणि म्हणून तो त्यावर लिहीत असतो. मला त्यांनी विचारलं की 'मग तुमचा बलुतेदारी हा विषय आहे. तुमची बोलीभाषा पण ग्रामीण आहे. एकंदर तुमचं सगळं वातावरण हे ग्रामीणच आहे मग ते तुम्ही भोगलेले अनुभवलेले आहे का किंवा ती कादंबरी तुमच्या जीवनावरती आहे का?' तर मी त्यांना सांगितले की 'ती कादंबरी माझ्या जीवनावर आहे. माझ्या जीवनाच्या अनुभवांशी निगडित आहे..मी जे पाहिलं अनुभवलं तेच मी त्या कादंबरीत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे.'

    मला एक फोन आला आणि त्यांनी विचारले की "तुमची कादंबरी आहे त्या "गोंडर"कादंबरीमध्ये तुम्ही समाजाचं जगणं मांडलं तर मीही असा काहीतरी विषय घेऊन लिहू इच्छिते"

..ती महिला होती... मी म्हटलं 'खूप छान!'

 'आणि तुमच्या कादंबरीची आणि तुमच्या मार्गदर्शनाची मला आवश्यकता आहे'

     'नक्कीच अल्वेज नेहमीच मी तुम्हाला मार्गदर्शन करील'

    त्यावर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला की..."मी तुमची कादंबरी वाचून मी कादंबरी लिहायला घेतलेली आहे आणि बरेच फास्ट लिहीत आहे. तर माझी कादंबरी किती दिवसांमध्ये होईल किंवा तुम्ही जी कादंबरी लिहिली... त्या परिसरात लिहिली तर मला वाटते की माझी कादंबरी एका वर्षामध्ये होईल..." असे तिने म्हटले.

 मी म्हणलं ...'छान खूपच छान..' मी मनातल्या मनात हसलो....

 पण तिचं म्हणणं होतं की, मी एका वर्षामध्ये कादंबरी लिहणार...

 त्यावर मी तिला 'हो' म्हटलं .....पण तिचा जेव्हा दुसरा प्रश्न माझ्यासमोर आला ...

तेव्हा ती म्हणाली..."तुम्ही ही कादंबरी किती दिवसांमध्ये प्रकाशित केलेली आहे म्हणजे तुम्हाला ही कादंबरी लिहिण्यासाठी किती वर्षे लागलेली आहेत...?"

त्यावर मी तिला स्पष्ट उत्तर दिलं की 'ही "गोंडर" कादंबरी मी बारा वर्षांमध्ये लिहिलेली आहे. 2012 ला मी लिहायला घेतलेले हे कथानक जवळपास 2014 मध्ये डीटीपी टाईप वगैरे बऱ्याच गोष्टीवर होतं नंतर काही तांत्रिक अडचणी येतात आणि त्यातून या गोष्टी पुढे जात जातात... लांबत राहतात आणि मग आपल्याला काहीतरी काळ लागतो... तशी कादंबरी यायला दहा ते बारा वर्षे लागलेले आहेत...'

त्यावर त्यांनी अक्षरशः "मी तर कादंबरी एका वर्षात होईल असं समजलं होतं..."

    - एका वर्षात येतील पण त्यासाठी दर्जा असावा लागतो.. दर्जा येण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे आणि दर्जा जर पाहिजे असेल तर दर्जेदार साहित्य लिहिण्यासाठी आपण मेहनत घेतली पाहिजे. आपण अनेक गोष्टी वाचतो. 

     त्यांचा दुसरा प्रश्न होता की 'आपण दिलेल्या पुस्तकाला वाचक मिळतो का?' 

    मी त्यावर त्यांना सांगितले की "तुम्ही माझी कादंबरी मुंबईवरून विकत घेतलेली आहे आणि 'गोंडर'ची पहिले आवृत्ती प्रकाशनपूर्व विकल्या गेली आणि त्यानंतर त्याचे वितरण जरा हळूहळू चालू आहे. म्हणजे मला एक म्हणायचं आहे की, वाचक नाही अशी जी आपल्याकडे ओरड आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे..  आणि वाचक जर नसेल तर त्याला जबाबदार लेखक आहे त्याचं कारण असं आहे की, वाचक काय करतो... वाचक हा चांगलं साहित्य शोधत असतो. चांगल्या लेखकाचे चांगले पुस्तक तो मागवत असतो आणि तो वाचत असतो. जर वाचक नाही असे मी जर म्हटलं तर माझ्या हजार प्रती  एक-दीड महिन्यामध्ये संपल्या तर वाचक नाही कसं म्हणणार मी? अक्षरशः लोकांनी फोन करून पैसे टाकून 'गोंडर' कादंबरी बुक करून ते मागवल्या अनेकांनी. तर मला जर पाठवायला वेळ झाला तर ते म्हणायचे की मला 'सर ते माझी कादंबरी कधी येते मला कधी मिळते?' म्हणजे एवढी उत्सुकता लोकांमध्ये वाचण्याची होती. तर वाचण्याची आवड लोकांना नाही हे आपण म्हणू शकत नाही.. त्यामुळे चांगल्या आणि दर्जेदार लेखनाची वाचक हा सतत  वाट पाहत असतो आणि दर्जेदार साहित्य नेमकं लिहिण्यासाठी काय नेमकं असलं पाहिजे.

    तर आपण काही गोष्टींच्या काळजी घेतली पाहिजे. ती काय काळजी घ्यायची मग

या विषयाच्या संदर्भात मी एवढेच सांगणार आहे. आपल्याकडून दर्जेदार लेखन व्हावे असे वाटत असेल तर आपण ज्येष्ठ आणि साहित्यातील मुरलेल्या आणि दर्जेदार लेखन करणाऱ्या साहित्यिकांचं साहित्य आवर्जून वाचलं पाहिजे. ज्या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला लिखाण करायचा आहे तो साहित्यप्रकार आपण अनेक ज्येष्ठ आणि इतर साहित्यिकांचा तो प्रकार वाचला पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण भरपूर वाचन करून कमी लेखन केलं पाहिजे. मनभर वाचून कणभर लिहिण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. आजकाल आपण वाचत नाही किंवा वाचनाकडे लक्ष देत नाही आपणच लिहीत असतो. आपणच लिहून इतरांना आपलं वाचावं असं वाटत असतं पण आपण इतरांचं वाचलं तर आपलं साहित्य हे दर्जेदार होतं आणि त्याला एक वेगळा मान मिळतो. दर्जेदार साहित्य लेखन म्हणजे काय..? तर जी साहित्यकृती वाचल्यानंतर सामाजिक परिवर्तन व्हायला लागतं किंवा समाजातील तळागाळातील लोकांच्या भावना असतील किंवा त्यांचं जगणं असेल कष्टकरी /वंचित/ दलित/ बहुजन/ शेतकरी/ कष्टकरी यांचे जगणं आपण आपल्या साहित्यातून अधोरेखित केले पाहिजे या आणि अशा साहित्याला साहित्यामध्ये खूप मोठा दर्जा आहे. आपण जगलेलं अनुभवलेलं पाहिलेलं विश्व रेखाटण्याचं काम साहित्यिक लेखक करत असतात आणि त्यांनी ते इमाने इतबारे केलं पाहिजे. साहित्य लेखनासाठी कुठलाही विषय ओढून ताणून आणायची गरज नाही. साहित्य हे दर्जेदार व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला काळजी घ्यावयाची असेल तर आपण ती काळजी घेतली पाहिजे..की साहित्य हे ओढून ताणून किंवा कुणाच्यातरी सांगण्यावरून लिहिलं नाही पाहिजे. तर ते आपल्या मनामध्ये आपल्या विचारांमध्ये त्याची ठिणगी पेटली पाहिजे आणि ती ठिणगी तुमच्या साहित्यकृतीमधून शब्दाच्या रूपाने ती बाहेर आली पाहिजे.

समजा एखादी कविता तुम्हाला लिहायला सांगितली आणि ते तुम्ही लिहायची म्हणून लिहिली तर त्यात दर्जेदारपणा मुळीच येणार नाही. तुम्ही कुणाच्या म्हणण्यानुसार कविता लिहिली नाही पाहिजे..आणि कुठे सादरही केली नाही पाहिजे. आपली कविता ही श्रेष्ठ कविता आहे. असे प्रत्येक माणसाने कवींने आपल्या मनामध्ये धरले पाहिजे. आपली कविता मी कुठेही म्हणणार नाही. माझी कविता मला वाटेल तेव्हा म्हणेल.. माझ्या मनातून कविता म्हणण्याचा जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी कविता सादर करीन..असे जेव्हा वाटते तेव्हाच कविता ही दर्जेदार कविता असते.

अनेक वेळा आपण पाहतो. कविसंमेलनात लोकांची लाईन लागलेली असते..कविता म्हणण्यासाठी तितकीच माझी कविता सोपी नाही.. की मी कुठेही लाईन लावून उभे राहून म्हणावी..! कुणी म्हण म्हणल्याबरोबर मी तीच माझी कविता म्हणावी.. लोकांना ऐकवावी एवढी साधी /सोपी /सरळ आणि स्वस्त माझी कविता नाही...असं करून सांगितलं पाहिजे. तुम्हाला ऐकायचे असेल तर मी सांगेल त्या पद्धतीनेच तुम्ही ऐकले पाहिजेत..

अन्यथा बस स्टँडमध्ये, रेल्वेमध्ये, बसस्टँडमध्ये गाडीवर कुठेही कविता सादर करून आपण आपल्या कवितेचा अपमान करतो आहोत. कविता तुम्हाला सादर करायची असेल तर तशीच जागा..तसाच रसिक असल्याशिवाय कविता सादर करायची नाही.. कविता सादरीकरण लेखन करते वेळेस कवीने जर या सर्व गोष्टीची काळजी घेतली.. तर तुमची कविता सरस होईल. कविता म्हणते वेळेस ऐकणाऱ्याच्या डोळ्यात डोळे टाकून तुम्ही कविता म्हणली पाहिजे. तुमची कविता तुम्हाला पाठ असली पाहिजे. पाठ असलेली कविता तुम्ही जर सादर केली तर त्याचा एक वेगळा आविष्कार होतो. सादरीकरण वेगळं होतं. ते लोकांना आवडते. आपली कविता पाठ नसेल तर..आपण खाली पाहून सादरीकरण करतो.. तेव्हा आपली कविता लोकांपर्यंत थेट जात नाही आपण त्याच्याशी कनेक्ट होत नाही रसिकांशी. तेव्हा मात्र तुमची कविता चांगली आणि दर्जेदार असूनसुद्धा ती पडते..तुमची कविता उठवायची असेल.. लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर रसिकांच्या डोळ्यात डोळे घालून समोर पाहून तुम्ही कविता म्हटली पाहिजे आणि त्यांनी ती ऐकली पाहिजे असे वातावरण असेल तरच सादर केली पाहिजे म्हणजे अशा अनेक बारीक सारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. तेव्हा आपलं साहित्य हे दर्जेदार असणार आहे.

अनेक ठिकाणी लोक विषय देऊन कविता लिहितात. तर ती कविता तयार होईल? अशा कविता आपण दिवसातून शंभर तयार करू.. हजारो काव्यसंग्रह आपले तयार होतील.. पण त्यात दर्जा असणार नाही. त्यात दर्जा आणायचा असेल..  ती कविता दर्जेदार व्हावीशी वाटत असेल तर ती कविता अनेक वेळा आपण लिहिली पाहिजे, अनुभवली पाहिजे, त्यावर सातत्याने त्या कवितेवर काम केलं पाहिजे. आजकाल आपण पाहतो की काव्यस्पर्धेचे अनेक ग्रुप आहेत. अनेक ठिकाणी कविता काव्यस्पर्धा घेतल्या जातात आणि त्यातून अनेक कवी कविता लिहितात पण त्या कविता दर्जेदार असतात का? आणि अशा स्पर्धांमधून दर्जेदार साहित्य निर्माण होते का? असा प्रश्न मला नेहमी पडत असतो पण त्याचं उत्तर माझ्या मनात एकच येतं की त्यातून दर्जेदार साहित्य निर्माण होत नाही किंवा आपण त्या विषयाला धरून लिहीत असतो आपल्या डोक्यात तो विषय असतो त्यातून आपण लिहीत असतो. ती कविता दर्जेदार तेवढी होऊ शकत नाही. आपण रस्त्याच्या कडेने चाललो आणि आपल्याला जर एखादं पाल दिसलं त्या पालाच्या अवतीभोवती खेळणारी लेकरं दिसली तो माणूस तिथे काम करणारा पुरुष दिसला त्याच्यासोबत काम करणारी बाई दिसली आणि हे उघड्यावरलं जगणं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या घरामध्ये मनामध्ये आपले कविता निर्माण होते. आपल्या कवितेचे शब्द तयार होतात आणि तिथे कविता जन्म घेते आणि मग जेव्हा ते शब्द कागदावरती उमटतात तेव्हा ती कविता तयार होते. तशी आलेली कविता अनुभवातून आलेली कविता जगण्यातून आलेली कविता ही दर्जेदार कविता असते आणि कवितेसाठी व्याकरण किंवा काना मात्रा वेलांटी या गोष्टी तेवढ्या पाहिल्या जात नाहीत कारण आपण फेसबुक किंवा समाज माध्यमावर टाकताना आपल्याला वाटतं की कविता चांगली गेली पाहिजे पण त्यातही आपण सुधारणा करू शकतो पण कवितेच्या भावना कवितेची प्रतिमा कवितेची तेथील प्रतीकं हे दर्जेदार असले पाहिजे. आपण काव्यसंग्रह करताना आपण नक्कीच त्या व्याकरणाची काळजी घेऊ कारण ते चिरकाल टिकणार असं साहित्य असतं आणि म्हणून पुस्तकांमध्ये चुका राहू नये कारण पुस्तक निर्मिती एकदा होते आणि पुस्तक निर्मिती झाल्यानंतर ती कायमस्वरूपी तसेच असणारी असते म्हणून पुस्तक छापते वेळेस त्यात दोष राहू नये मुद्रण दोष राहू नये यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे. एखादा जर मुद्रण दोष राहिला एखादा जर ग्रॅमॅटिकल शब्द चुकीचा वाटला तर तो शब्द आणि ती चूक आपल्याला सतत आपल्या लक्षात येते आणि आपल्याला ते त्या दर्जेदार साहित्याला घातक होऊ शकते म्हणून त्यावेळी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे आणि त्या गोष्टीची काळजी घेऊ. समजा अशोक कुबडे या नावातील कुबडेची पहिली वेलांटी ऐवजी दुसरी वेलांटी दिली तर मला सातत्याने सदैव नेहमी वाटेल.. की यामधला कुबडे हा शब्द चुकला आणि तुम्ही बाकी किती अक्षर चांगलं काढलं, किती चांगलं दर्जेदार लिहिली याकडे माझं लक्ष राहत नाही.. त्या अक्षरातील चुकलेल्या उकाराकडे लक्ष जाईल आणि दर्जेदार साहित्यापासून आपण वंचित राहू म्हणून त्यावेळी ती काळजी घेणे आवश्यक आहे. आजकाल अनेक गोष्टींच्या स्पर्धा होतात. तुम्हाला कवितेची स्पर्धा मान्य नाही. मी कवितेच्या स्पर्धेला त्या  स्पर्धेला असं म्हणेन की त्यातून कवी जन्म घेतील पण ते टिकणार नाही. टिकायचं असेल तर दर्जेदारच लेखन झालं पाहिजे. मग त्यात लगेबाजी चालते जवळच्या लोकांना नंबर काढला जातो मग काय होतं तर एक दर्जेदार साहित्यिक त्यापासून वंचित राहतो. आपले कुठेतरी खच्चीकरण होते की माझा नंबर आला नाही आणि आपण लिखाणापासून दूर जाऊ शकतो म्हणून मला वाटतं की या स्पर्धा जरा मला अवघडच वाटतात. अवजड वाटतात. कारण कवितेची स्पर्धा होऊच शकत नाही. कविता एक भावना आहे. एक अनुभव आहे. उत्कट मनातून आलेला तो कलेचा आविष्कार आहे तो तो आपल्या मनाने येऊ द्यावा. त्याला ओढून काढून आणता कामा नये. जर ओढून काढून आणलं तर ते दर्जेदार येणार नाही म्हणून त्यासाठी स्वयंस्फूर्तीने आलेलं खूप चांगलं कथालेखन आहे..कादंबरी लेखन आहे. ललित लेखन आहे. कविता लेखन आहे. चारोळी लेखन आहे. प्रवासवर्णन / आत्मचरित्र आहे. असे साहित्यातले अनेक प्रकार आपण स्वयंस्फूर्तीने लिहिले पाहिजे. जे लिहावं वाटलं ते लिहिलं पाहिजे. इतरांच्या सांगण्यावरून लिहिणं हे दर्जेदारपणाचे अजिबात लक्षण नाही तर काम चलाउपणाचे लक्षण आहे असे मला वाटतं. दर्जेदार साहित्य लेखन करायचे असेल तर अशाच काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक लेखकांच्या कथा कविता कादंबऱ्या या वाचाव्यात आणि जास्तीत जास्त वाचन करून कमीत कमी लिहावं...


 मला कुसुमाग्रजांचा एक किस्सा या ठिकाणी आठवतो की, कुसुमाग्रजांना एका कवीने विचारले की तुम्ही ही जी कविता लिहिलेली आहे. तर या कवितेला किती दिवस लागले असतील...?

तर कुसुमाग्रज यांनी सांगितले की ही कविता मला लिहायला अडीच वर्षे लागले..!

  त्यावर तो कवी म्हणाला बाप रे अडीच वर्ष अडीच वर्षात मी पाचशे कविता दिल्या असत्या..

 त्यावर कुसुमाग्रज म्हणाले..मी ही कविता पाच मिनिटात लिहिली असती.. पण ती कविता मला समाधान देणारी झाली नसती. जोपर्यंत माझं समाधान होणार नाही.. मला पाहिजे तो शब्द आणि मला पाहिजे ती भावना माझ्या कवितेतून व्यक्त होत नाही.. तोपर्यंत ती माझ्यासाठी कविता नाही.. मला या कवितेत जो शेवटच्या ओळीत एक शब्द पाहिजे होता तो शब्द माझ्या मनासारखा आणि समाधान देणारा मिळत नव्हता म्हणून मी झटत होतो.. म्हणून अनेक दिवस लागले तरी चालतील आणि तसे त्यांनी अडीच वर्षांमध्ये एक कविता लिहिली...

 सांगायचं असं आहे की आपण कविता लिहितो आणि क्षणांमध्ये ते उचलतो की फेकतो.. त्याचे रिप्लाय आपल्याला येतात काही लोक चांगले म्हणतात काही लोक वाईट म्हणतात... पण त्यात आपलेही समाधान नसतं.. कवितेने समाधान दिले पाहिजे.. एकच कविता लिहायची पण ती नंबर वनच झाली पाहिजे. एकच कथा लिहायची पण ते नंबर वनच झाली पाहिजे. एकच कादंबरी लिहायची पण ती नंबर वनच झाली पाहिजे..एकच कविता लिहायची पण ते नंबर वन पाहिजे... त्यासाठी अनेकांचे साहित्य वाचणे आवश्यक आहे.. मगच लिहिणं आवश्यक आहे. मनभर वाचून कणभर लिहा.. पण कणभर वाचून मनभर लिहू नका... कारण किती लिहिले याला महत्व नसतं... तर काय लिहिलं आणि कसं लिहिले याला महत्त्व आहे.. त्यासाठी आपण दर्जेदार साहित्य लेखनासाठी जास्तीत जास्त वाचन करण्याची गरज आहे..

तेवढे जरी काळजी घेतली तरी तुम्ही तर साहित्य घेऊ शकता.. असं मला वाटतं आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगाने अगदी थोडक्यात मी माझं मत मांडलेला आहे. या विषयावरती अनेक बोलता येईल..

याच दर्जेदार साहित्य सोबत दर्जेदार मराठी संमेलन झाली पाहिजे. मराठी साहित्यात विविध साहित्यिक प्रवाह आले पाहिजेत आणि लोकांनी लिहीतं झालं पाहिजे. साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात तो वर्तमान काळातील ज्या काही घटना घडामोडी आहेत जे काही सचित्र असं वर्णन आहे त्याला जे काही दिसत असतं समाजामधल्या वाईट सवयी असतील प्रथा असतील किंवा समाजामध्ये काही वाईट मतप्रवाह असतील या सर्वच गोष्टींवर तो सातत्याने आपलं विवेचन करत असतो तो लिहीत असतो आणि त्यातून तो आपलं साहित्य लोकांना देत असतो विचार देत असतो विचार देण्याचे काम हे साहित्यिकांनी नेहमीच केलेला आहे. साहित्यिकप्रवाह हे वेगवेगळे विचार देत असतात मग त्यामध्ये दलित साहित्य आलं... ग्रामीण साहित्य आलं तसेच बालसाहित्य आलं. बालसाहित्याचे प्रमाण अलीकडे खूप कमी प्रमाणात पाहायला मिळते. वाचायला मिळते आणि या सर्वच साहित्य प्रकारातून आपण प्रेरणा घेत असतो. मला एक कधी कधी प्रश्न पडतो की जो परंपरेनुसार किंवा परंपरेने परंपरागत चालत आलेला साहित्य प्रकार आहे ते साहित्य प्रकार सोडून काही इतर प्रकार आपण आजकाल अनुभवत आहोत आजकाल सोशल मीडियाचा व्हाट्सअप फेसबुकचं जग आहे  या जगामध्ये अनेक प्रवाह साहित्याचे अनेक प्रकारे ही प्रचलित झालेले आहेत. कधी या संदर्भात मी थोडासा शाशंक का असतो त्याचं कारण की कथा, कविता, कादंबरी, चारोळी, मुक्तछंद कविता हे साहित्यिक प्रकार आपण हाताळत असतो आणि हे साहित्यप्रकार हाताळत असताना शिरीष पै यांनी एक साहित्य प्रकार 'हायकू' नावाचा हाताळला. पण अलीकडे अनेक साहित्यप्रकार या व्हाट्सअप फेसबुक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये दोन काहीतरी असं नाव आहे त्याचं बघा तो साहित्यप्रकार आला त्यानंतर कोणता तरी दुसरा असा प्रत्येक प्रकार येत असतात आणि ते प्रकाराचे कोण तयार करतो त्याची नियमावली काय आहे आणि तो कसा लिहायचा असतो ते त्यांनीच ठरवलेलं असतं त्याचे नियमही त्यांनी ठरवलेले असतात मग ते प्रकार लिहून जर मराठी साहित्यामध्ये आपण घेऊन येऊ तर मला वाटते की आपल्याला थोडं साहित्यिक म्हणून पुढे यायला जरा अवघड जाणार आहे. त्याचं कारण असं किती प्रकार वाचकांना कळाले पाहिजे समजा तो एखादा कोणता तरी प्रकार कोणाला तरी काढला आणि त्या प्रकारे आपण साहित्य लिहायला सुरुवात केली पण जर करता तुझ्या या प्रकाराचे नियम किंवा नियमावलीच लोकांना माहीत नसेल तर मग तो कळणार नाही ना त्याचा अर्थ बोध होणार नाही आणि अर्थबोध होण्यासाठी आपल्याला त्या साहित्याच्या प्रकाराची माहिती असणे आवश्यक आहे. फक्त साहित्यिकांनी माहिती घेतली पाहिजे आणि जर ते प्रकार लिहायचे असतील तर ते वाचकांना माहीत असले पाहिजे त्यासाठी इतर साहित्यिक प्रकारच्या पडतात जर काही आपल्या महत्त्वाची असतील ती जर आपण लिहित राहिलो तर लोकांपुढे एक वेगळा प्रयोग पुढे जाईल इतर प्रवाहात प्रकारात अडकून बसून आपला वेळ व  बुद्धी वाया घालवतात त्यापेक्षा सर्वसाधारण सकस लिखाण केलं तर नक्कीच आपल्याला चांगलं मिळतं आणि चांगले लिहिण्यासाठी चांगले वाचावं लागतं. चांगलं वाचलं तर नक्कीच चांगलं लिहिता येते मनभर वाचून कणभर लिहिण्याच्या वृत्ती असावी...


लेखक हा लिहून जबाबदारी झटकू शकत नाही... तर समजा प्रत्येकाच्या खूप मोठी जबाबदारी आहे. वाचन संस्कृती टिकून ठेवणे, लेखन संस्कृती टिकवून ठेवणे, वाचकांना काय हवं ते मिळवून देणे ही लेखकाची जबाबदारी असते. एवढेच नाहीतर समाजामध्ये ज्या काही गोष्टी असतात मग त्या राजकीय असो सामाजिक असो शैक्षणिक असो साहित्यिक असो आर्थिक असो, सामाजिक वा कोणत्याही या प्रकाराविषयी समाजामध्ये काही गोष्टींची अन्याय करत असतील तर त्यावर साहित्यिकांनी तुटून पडले पाहिजे.. कारण ती त्यांची जबाबदारी आहे. साहित्यिक हात वर करून मोकळा होऊ शकत नाही कारण त्याला परिस्थितीची समाजाची समाजाच्या बुद्धीची विचारांची जाण असते त्यामुळे तो जागरूक आणि समाजाप्रति क्रियाशील असला पाहिजे. समाजावर होणारा राजकीय अन्याय असो, सामाजिक अन्याय.. त्यावर त्यांनी लिहिले पाहिजे.. जबाबदारी स्वीकारण्यासाठी त्यांना लिहिलं पाहिजे.. मग ते तुम्ही सोशल मीडियावर लिहा व्हाट्सअप /फेसबुक वर्तपत्रातून लिहा. आजकाल आपण पाहतो की आपल्याकडे एवढे इन्स्टंट माध्यम आहे एका मिनिटांमध्ये आपण कविता किंवा काही लिहू शकतो आणि मांडू शकतो पण यावरही दर्जेदार लिहायचं असेल तर आपण एवढे इन्स्टंट लिहून चालणार नाही त्यासाठी वेळ द्यावा लागेल त्यासाठी वाचन करावे लागेल तेव्हाच कुठेतरी दर्जेदारपणा त्यामध्ये येईल. विविध साहित्यप्रकार लिहून विविध कलाकौशल्य वापरून आपण समाजामध्ये वाचनसंस्कृती टिकवून ठेवली पाहिजे. फार मस्त फंडा वापरलाय एसटीने. कारण बसमध्ये कोणी आजकाल प्रवास करत नव्हतं पण त्यांनी महिलांना 50 टक्के सूट दिली आणि ज्येष्ठ नागरिकांना बसतील आणि काय झाले बस फ्री असेल. तो कुठे जाणार असेल तर त्यांच्यासोबत जाण्यासाठी दुसरा एक किंवा दोन माणसे लागतात म्हणजे एकाचे तिकीट जरी नाही मिळालं तर दोघांची तिकीट मिळतात किंवा महिला ही कधीच एकटी जात नाही ते मुलाला, मुलीला, नवऱ्याला, सासू-सासऱ्यांना किंवा शेवटी आजोबांच्या मैत्रिणींना का होईना पण ते घेऊन जाते त्यामुळे एका महिलेमुळे दुसरे दोन प्रवासी मिळतात हा त्यांचा हेतू आहे म्हणजे असं काहीतरी स्किल आपण लेखकांनी वापरला पाहिजे. आपलं आपण काय करतो की एखादे पुस्तक आपण काढतो ते लिहितो.


पण लेखक काय करतो मला असं वाटतं की आपण एखादी साहित्यकृती प्रकाशित केली ती प्रकाशकांने छापलीसुद्धा... जो काही व्यवहार झाला.. ते दोघांनाही मान्य असतं पण त्यानंतर तो कधीही असं करत नाही की लोकांपर्यंत कशी जाईल. असेपर्यंत लिहिण्यासाठी दहा वर्ष झाले पण ती लवकर वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्याकडे वेळच नसतो. तो काय करतो की लगेच पुस्तकाचे प्रकाशन करतो. आपल्या काही मित्रांना काही समीक्षकांना वाटतो आणि दोन-तीन पेपरला त्याच्या बातम्या जाहिराती येतात आणि तो शांत. मग दुसऱ्या पुस्तकाच्या नादी लागतो. त्याला दहा वर्षे लागतात. पण माझी एक स्पष्ट अशी भूमिका आहे की एखाद्या पुस्तकाला तुम्ही जर एवढ्या बारकाईने गोंजारत असाल... त्यावर संस्कार करत असाल ही साहित्यकृती चांगली आली पाहिजे यासाठी जर एवढा प्रयत्न करत असाल तर मग ती साहित्यकृती आल्यावर पूर्ण तयार झाल्यावर ते बरोबर वितरित का करत नाही किंवा त्या वितरणाकडे लक्ष का देत नाही? चांगल्या साहित्यात लेखकापर्यंत जाईल वाचकांपर्यंत जाईल त्यासाठी काळजी का घेत नाही असं मला वाटतं. मला एका जणाने प्रश्न विचारला की 'सर तुमच्या कादंबरीची भरपूर चर्चा आहे. फेसबुक व्हाट्सअप यावर तुम्ही तुफान वाजवलेला आहे. एक वादळ निर्माण केलेलं आहे 'गोंड'र कादंबरीने 'गोंडर कादंबरी मिळावी...' निर्माण केलेला आहे.. पण तुम्ही खूप मेहनत घेता त्यावर'

      त्यांना असं म्हणायचं होतं कि मीती मेहनत घेण्यापेक्षा प्रकाशनाने घेतली पाहिजे असं त्यांना म्हणायचं होतं. पण माझं मत आहे की ते तर त्यांच्या पद्धतीने मेहनत घेतातच आणि त्यांनी ती वितरणासाठीच प्रकाशित केलेली असते. माझी कादंबरी तर इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सरांनी मानधनासह स्वीकारलेली आहे. मी त्यांचा ऋणी आहे. तसेच राजेश्वर क्रिएशनचे विजयकुमार चित्तरवाड यांनी अत्यंत परिश्रम घेऊन उत्तम प्रकारे अक्षरजुळणी आणि मांडणी केलेली आहे तर चित्रकार प्रमोद दिवेकर यांनी समर्पक आणि प्रभावी मुखपृष्ठ दिलेले आहे. या दोघांचाही मी आभारी आहे.

     त्या काळामध्ये पुण्या मुंबईच्या अनेकांनी मला विचारलं की 'सर तुमची कादंबरी मानधनासह घेतली म्हणजे मानधन असं घेणं म्हणजे काय?'

    तर मी असं सांगू इच्छितो की, 'आपलं लेखन प्रकाशकांनी स्वीकारायचे ते छापायचे त्यांच्या पैशांनी आणि त्या लिखाणाच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मानधन द्यायचं दहा हजार, पंधरा हजार आणि ती जी कलाकृती आहे ती त्यांनी पैसे खर्च करून छापायची आणि ती त्यांनी पुस्तक स्वरूपात विकायची असा आपला एक व्यवहार झालेला असतो. हा प्रकार अलीकडे पाहायला मिळत नाही. आमचे आदरणीय दत्ता डांगे सर म्हणजे इसाप प्रकाशनाचे संचालक हे लेखकांना  सन्मान देतात, त्यांचा मान करतात. त्यांच्या साहित्य लेखनाचा खूप सन्मान करतात. म्हणजे माझी कादंबरी जेव्हा त्यांनी काढली ही लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तेवढेच प्रयत्न मी का करू नये? लिखाण करून मी मोकळा झालो.  असं होता कामा नये. माझी जबाबदारी आहे..ती मीही ती कादंबरी असेल ते पुस्तक असो ते लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली पाहिजे जेवढी लिखाणासाठी घेतली तेवढीच किंबहुना त्यापेक्षा जास्त...


म्हणजे लेखकानेसुद्धा पुस्तक विक्रीसाठी पुस्तक लोकांपर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे..आपली कादंबरी पाठविण्यासाठी खूप प्रयत्न करावे.

   सुरुवातीलाच कादंबरीच्या जवळपास 885 प्रती पाठवायच्या अगोदर पोस्टाने सांगितले एवढ्या एकदाच घेत नाही. मग आम्ही एजन्सी पाहिली आणि तिथून त्या कादंबऱ्या पाठवतो. यासाठी प्रकाशकांचीही मदत घेतली.  सांगायचं हे आहे की प्रत्येकच लेखक कवी साहित्यिकांकडे साहित्य लेखनासोबतच साहित्यप्रसार ही कला याचेही कौशल्य असणे आवश्यक आहे आणि जरी नसेल तरी ते अवगत करणे जमले पाहिजे.. आणि आताच्या या नव्या सोशल मीडियाच्या काळामध्ये ही खूपच सोपी गोष्ट आहे... आपल्याला आता दुकान लावावे लागत नाही...आपल्याकडे काय एका मिनिटांमध्ये तुम्ही महाराष्ट्रात पोहोचू शकता. एवढं सामर्थ्यशाली एक शस्त्र तुमच्या हातामध्ये आहे. या शस्त्राचा वापर कसा करायचा यासाठी आपण एक वेगळी कार्यशाळाच आपल्याला घ्यावी लागेल.. यामुळे चांगलाच फायदा होतो.. या तंत्राचा उपयोग केला तर आपण जगामध्ये जाऊ शकतो आणि जर वाईट उपयोग केला तर आपण काहीच करू शकत.. एवढं खतरनाक असं शस्त्र आहे त्यामुळे याचा वापर आपण साहित्य प्रसारणासाठी करू शकतो. साहित्य लेखनासाठी करू शकतो म्हणून आपण त्याचा वापर त्या पद्धतीने केला पाहिजे आणि मोबाईल जर आपल्याकडे नसता तर आपण एवढं असं भेटलं नसतं.. एकमेकांना आपल्या ओळखीच्या फक्त केवळ याच्यावरती आहेत फेसबुक किंवा व्हाट्सअप वरती झालेले आहेत.. आज मला सुरुवातीला जेव्हा मी कोष्टी काकांना पाहिलं तर आम्हाला एकदमच आठवलं की काकांना मी गेली आठ दहा वर्षापासून बोलतो व्हाट्सअपवर आहे.. फेसबुकला आहे पण हरिदास कोष्टी काका आज भेटले.. साहित्य संमेलन किंवा मोबाईलमुळेच शक्य आहे..  तर मोबाईल मध्ये चांगला वापर करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येतो...

एकंदर सोसियल मिडिया असो साहित्य संमेलन असो किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून साहित्य लेखन केले पाहिजे आणि आपल्या साहित्य लेखनाचा दर्जा हा यशस्वी आणि सुंदर असला पाहिजे .. आपल्या साहित्यातून गरीब कष्टकरी दीनदुबळ्याने समाजातील शेवटच्या माणसापर्यंत लेखन पोचलं पाहिजे एवढीच एक अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून करतो 

 96वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येथे वर्धा येथे पार पडले.. हे साहित्य संमेलन या वर्धा नगरीत पार पडल्याने या वर्धा नगरीतील आणि जिल्ह्यातील साहित्यिकांच्या लेखनाची आणि वाचक रसिकतेची साहित्याप्रति चांगली मशागत झालेली आहे आणि असे साहित्य संमेलन जेव्हा ज्या परिसरात होतात तेव्हा त्या परिसरात लेखक आणि वाचक यांचे खूप मोठे प्रमाणात लाभ घेतात...यातूनच तो जिल्हा समृद्ध असा वाटायला लागतो...96वे साहित्य संमेलन हे वर्धा येथे झाले. साहित्य संमेलनातून अनेकांना निमंत्रण दिल्या जाते...पण थोडीशी एक खंत वाटते की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून नवोदित कवींच्या लेखनासाठी काही ठोस पावले उचलली जात नाहीत.. त्यामुळे त्यांची निराशा होते.. अनेक वेळा तर मान्यवर साहित्यिकांना बोलावून त्याची वेगळी व्यवस्था केली जाते. पण नवोदित साहित्यिकांसाठी फिस आकारली जाते... त्यांची हेळसांड केले जाते... त्यामुळे काही साहित्यिक लेखनापासून दूर जातात याकडे मराठी साहित्य संमेलनांनी जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे... आपण मोठ्यांना सन्मानाने बोलवतो तसेच नवोदितांनाही सन्मानाने बोलवून त्यांचा सत्कार सन्मान करावा आणि त्यातून त्यांना प्रेरित करून लेखनासाठी बळ द्यावं हीच एक अपेक्षा या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडून करतो.. शासनाकडून एवढा मोठा फंड येतो तो फंड लाटून केवळ काही लोकांना जेवण देऊ शकत नाही... हे अस्वस्थ करणारी बाब आहे..

गेली दोन दिवस या अव्यक्तपणे साहित्य संमेलनातील आयोजकांनी सर्वांची इतकी सोय केलेली आहे. अगदी त्यांना रेल्वे स्टेशन वरून आणण्यापासून त्यांची रेस्ट हाऊसला राहण्यापासून त्यांना जेवणापासून चहापासून प्रत्येक गोष्टीची काळजी संयोजकांनी घेतलेली आहे.. एवढ्या तुटपुंज्या वर्गणीवर एवढे चांगलं काम होऊ शकतं आणि इतक्या चांगल्या लोकांपर्यंत एक चांगलं साहित्य संमेलन एका दर्जेदार पद्धतीने करता येते हे शिकवण दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूपच कौतुक आहे. अव्यक्त अबोली या राज्यस्तरीय सहित्य संमेलनात मला अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकली माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला या माझ्यासारख्या छोट्या माणसाला एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले त्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे संस्थेच्या अध्यक्षा मा. जयश्री चव्हाण तसेच  सचिव मा. योगेश ताटे, मा. शीला आठवले, मा. स्नेहल मेंढे, मा. मनोहर शहारे आदी सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा मनस्वी आभारी आहे.. नक्कीच हे साहित्य संमेलन एक दिवस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बरोबरीचे नियोजन करेल.. अशी मला आशा आहे..


अशा शुभेच्छा मी या साहित्य संस्थेला देतो आणि मला अध्यक्षपद दिल्याबद्दल त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो आणि माझं भाषण आपण सर्वांनी ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनस्वी आभारी आहे..याच ठिकाणी थांबतो...

 जय हिंद... जय महाराष्ट्र...!!

  


अशोक कुबडे

४ थे अव्यक्त अबोली साहित्य संमेलन अध्यक्ष 

पुलगाव वर्धा

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला